Advertisement

पक्ष्यांची घरटी असलेल्या फांद्यांची छाटणी नको!


पक्ष्यांची घरटी असलेल्या फांद्यांची छाटणी नको!
SHARES

मुंबईत दरवर्षी पावसाळयात फांद्यांच्या छाटणीचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेतले जाते. परंतु या फांद्यांच्या छाटणीमुळे झाडांवरच्या पक्ष्यांची घरटी नष्ट होऊन पिल्ले मृत पावतात. त्यामुळे झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना आधी घरट्यांची पाहणी करावी. घरटे नसेल तरच फांद्यांची छाटणी केली जावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविकेने केली आहे.


घरट्यांची काळजी घ्यावी

महापालिकेच्या अर्थसंकल्पावर भाषण करताना शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी फांद्यांच्या छाटणीबाबत चिंता व्यक्त केली. मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून तसेच त्यांच्या फांद्या तुटून दुर्घटना घडतात. त्यामुळे फांद्यांची छाटणी करताना या फांद्यांवर पक्ष्यांची घरटी नाहीत ना याची काळजी घेतली जावी, अशी सूचना त्यांनी केली. विकास आराखड्यातही पक्ष्यांच्या घरट्यांची काळजी घेण्याबाबत नमूद केले आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्या छाटल्यामुळे पक्ष्यांचे घरटे नष्ट होणार नाही याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे, असे त्यांनी सांगितले.


अभियंत्याच्या धर्तीवर वृक्ष तज्ज्ञांची नियुक्ती

पावसाळ्यापूर्वी झाडांचे रोपण व छाटणी ही कामे केवळ कंत्राटदारांच्या अकुशल कामगारांवर सोडून दिली जातात. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने ही कामे होत नसल्यामुळे दरवर्षी शेकडो झाडे रस्त्यांवर पडून दुर्घटना घडतात. त्यामुळे महापालिकेच्या विविध कामांसाठी दिलेल्या कंत्राटी कामांवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित विभागातील महापालिकेचे अभियंते असतात, त्याच धर्तीवर वृक्षांसंबंधातील कामे शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी वृक्ष तज्ज्ञांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


गणपत पाटील नगरमध्ये घाणीचे साम्राज्य

गणपत पाटील नगरमधील १ ते १४ गल्ल्यांमध्ये सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गल्ल्यांमध्ये जाण्यास पक्के रस्ते नसून मातीच्या रस्त्यांमुळे ठिकठिकाणी पाणी साचून दलदल तयार झालेली आहे. या सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे डास व माश्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांत सुमारे ४० हजार लोकवस्ती असलेल्या या भागात डेंग्यू, मलेरिया, अतिसार आदींचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लोकांच्या जिवाशी प्रशासनाने खेळू नये. अन्यथा येथील लोकांच्या आरोग्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला खुद्द महापालिका आयुक्त जबाबदार राहतील, असाही इशारा तेजस्वी घोसाळकर यांनी प्रशासनाला दिला.



हेही वाचा

मुंबई, तुला झाडांवर भरवसा नाय काय? वर्षाला 31 कोटी खर्च, तरीही पडझड!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा