Advertisement

'चेंबूर झाड दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'


'चेंबूर झाड दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'
SHARES

चेंबूरमधील झाड पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बुधवारी महापालिका सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी केली. मृत्यू पावलेल्या महिलेच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या गंभीर प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.


'प्रत्येक विभागात उद्यानविषयक तज्ज्ञ नेमा'

चेंबूर पश्चिम येथे नारळाचे झाड पडून महिलेचा मृत्यू झाल्यामुळे भाजपाच्या स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणली. यावेळी त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची नुकसान भरपाई आणि संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याला पाठिंबा देत या महिलेवर उपचारांसाठी 3 लाख रूपये खर्च झाला आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेविकेच्या मागणीनुसार १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावीच. परंतु त्याबरोबरच उपचाराचा खर्च महापालिकेने द्यावा, अशी मागणी केली. तसेच प्रत्येक परिमंडळांमध्ये उद्यान विषयक तज्ज्ञांची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून प्रत्येक धोकादायक झाडांची पाहणी केली जावी, अशी सूचना राजा यांनी केली.



झाडांमुळे सगळेच असुरक्षित

झाडांची छाटणी ही पावसाळ्यापूर्वीच न करता वर्षभर करण्यात यावी, असे सांगत भाजपाच्या ज्योती अळवणी यांनी झोपडपट्टी आणि खासगी इमारतींच्या आवारातील झाडांची छाटणी महापालिकेने करावी, अशी सूचना केली. झाडांमुळे कोणीच आता सुरक्षित नसल्याचे सांगत शिवसेनेचे संजय घाडी यांनी झाडांची छाटणी वर्षभर करावी, अशी सूचना केली. धोकादायक इमारतींप्रमाणे धोकादायक झाडांची छाटणी करण्यात यावी, अशी सूचना राष्ट्रवादीच्या डॉ. सईदा खान यांनी केली. बाजार व उद्यान समिती अध्यक्षा सान्वी तांडेल यांनी हा प्रकार गंभीर असून निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली.



हेही वाचा

एका झाडाचा बळी?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा