Advertisement

शेवाळेंमुळे 'रुफटाॅप' पार्टीच्या प्रस्तावाला मंजुरी नाही?


शेवाळेंमुळे 'रुफटाॅप' पार्टीच्या प्रस्तावाला मंजुरी नाही?
SHARES

मुंबईतील हॉटेलच्या गच्चीवरील (रुफटॉप) पार्टीसाठी परवानगी देणाऱ्या धोरणाचा प्रस्ताव मंजूर करण्याचे मातोश्रीचे आदेश असताना तसेच भाजपा आणि काँग्रेसने सभात्याग केल्यामुळे सुवर्ण संधी धावून आलेली असतानाही शिवसेनेने ही संधी हातची घालवली. हा प्रस्ताव मंजूर करण्याऐवजी शिवसेनेने सभाच तहकूब करत हा प्रस्ताव पुन्हा भिजतच ठेवला.

मात्र, यामागे राजकारण असून शिवेसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे या प्रस्तावासाठी ठाण मांडून बसल्यामुळे त्यांना शह देण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर केला नसल्याचे समजते. शेवाळेंची महापालिकेतील लूडबूड महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांना नको असून यापुढे शेवाळे असतील, तर हा प्रस्ताव मंजूर होणार नाही, असाच संदेश या नेत्यांनी दिल्याचे समजते.


युवराजांचे स्वप्न लांबणीवर

शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे ज्यासाठी प्रयत्नशील आहे, त्या मुंबईतील हॉटेलच्या गच्चीवरील (रुफटॉप) पार्टीसाठी परवानगी देणाऱ्या धोरणाचा प्रस्ताव पुन्हा एकदा बारगळला. हा प्रस्ताव तब्बल अडीच वर्षांनी सत्ताधारी शिवसेनेने सभागृहाच्या कामकाजाच्या पटलावर घेऊन मंजूर करण्याचा निर्णय घेतला होता. 

परंतु कचऱ्याच्या मुद्दयावरून निर्माण झालेल्या गोंधळात भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांनी महापौरांचा निषेध करत सभात्याग केल्यानंतरही याचा फायदा घेऊन या धोरणाचा प्रस्ताव शिवसेनेला मंजूर करता आला असता. परंतु सभागृहाचे कामकाजच तहकूब करण्याची मागणी सभागृहनेत्यांनी करून हाती आलेली संधीच शिवसेनेने दवडली. त्यामुळे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचे स्वप्न एकदा लांबणीवर पडले आहे.


अडीच वर्षांपासून प्रस्ताव पडून

मुंबईत मालकीची इमारत असेल आणि त्यात त्यांचे हॉटेल असेल, तर अशा हॉटेल इमारतीच्या गच्चीवर पार्टी करण्यास परवानगी देण्याचे धोरण महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आले आहे. या धोरणावरून वाद निर्माण झाल्यानंतर फेब्रुवारी २०१५मध्ये भाजपासह काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. 

त्यानंतर हा प्रस्ताव एप्रिल २०१५मध्ये हा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आल्यानंतर शिवसेनेने तो पटलावर घेतला. परंतु तो प्रस्ताव वारंवार तहकूब करण्यात येत होता. परंतु मागील आठवड्यात रुफटॉवरील पार्टीचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्यानंतर मागील अडीच वर्षांपासून राखून ठेवलेला हा प्रस्ताव सोमवारच्या सर्वसाधारण सभेत मांडून त्यावर निर्णय घेण्याचे शिवसेनेने निश्चित केले होते.


भाजपा, काँग्रेसकडून अप्रत्यक्ष मदत

या प्रस्तावाला काँग्रेसने आपला विरोध कायम असल्याचे आधीच जाहीर केले होते. तर भाजपानेही आपला विरोध असल्याचे खासगी जाहीर केले. त्यामुळे या प्रस्तावाला पुन्हा विरोध होऊन तो मंजूर होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु विरोधी पक्षनेते रवी राज यांनी कचऱ्यासंदर्भात केलेल्या निवेदनावर गटनेते वगळता काँग्रेसचे सदस्य अश्रफ आझमी यांना बोलायला दिल्यानंतर थेट सभागृहनेत्यांचे नाव पुकारले. त्यामुळे विषयावर बोलू न दिल्यामुळे भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनीही महापौरांच्या मनमानी कारभाराचा निषेध करत सभात्याग केला.


दुसऱ्यांना संधी दवडली

मात्र, राष्ट्रवादी गटनेत्या राखी जाधव, सपाचे गटनेते रईस शेख यांच्यासह त्यांच्या पक्षाचे नगरसेवक, मनसेचे नगरसेवक सभागृहात बसून राहिले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पुढे चालू ठेवून कामकाजावरील प्रस्ताव मंजूर करणे, सत्ताधारी शिवसेनेला शक्य होते. परंतु हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपने शिवसेनेला संधी उपलब्ध करून दिल्यानंतरही सभागृहनेत्यांनी सभागृह पुढे न चालवता तहकूब करण्याची मागणी केली. त्यामुळे  रुफटॉवरील पार्टीचा धोरणाचा प्रस्ताव मंजूर करण्याची संधी असतानाही शिवसेनेने हातची घालवली. 

या धोरणाबाबत दुसऱ्यांना शिवसेनेने ही संधी घालवली आहे. यापूर्वी एप्रिल २०१५मध्ये हेच धोरण मंजूर करण्यासाठी शिवसेनेने व्हीप बजावला होता. त्याप्रमाणे सदस्य उपस्थितही राहिले होते. योगायोगाने त्यावेळी मनोज कोटक हे गैरहजर होते आणि त्यावेळीही हे धोरण मंजूर करण्याची संधी असताना तत्कालिन महापौर स्नेहल आंबेकर यांनी ही संधी घालवली होती. त्याची पुनर्रावृत्ती सोमवारी घडली आणि युवराजाचे स्वप्न पुन्हा लांबणीवर पडले.


सर्वांना विश्वासात घेऊन प्रस्ताव मंजूर करू

सभागृहनेते यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्याची संधी आम्हाला होती, हे मान्य करत आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रस्ताव मंजूर करायचा आहे. त्यामुळे सर्व पक्षांना विश्वासात घेऊन तसेच त्यांचा विरोध जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यांना याचे महत्व पटवून तो प्रस्ताव मंजूर केला जाईल, असे सांगितले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा