Advertisement

आधी घरापासून सुरूवात मग परिसर केला हरित


आधी घरापासून सुरूवात मग परिसर केला हरित
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या स्वच्छ भारत अभियानाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र दादर शिवाजी पार्क येथील रोड क्रमांक 5 येथे राहणाऱ्या तसंनीम शकूल(52) या स्वच्छ भारत अभियान गेल्या अनेक वर्षांपासून राबवत आहेत. याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून केली. त्या आपल्या घरापुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत तर, त्यांनी ही संकल्पना एएलएमच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण परिसरात राबवली आणि पांडुरंग नाईक मार्ग हा स्वच्छ सुंदर आणि हरित बनवला. गेल्या अनेक वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यापासून त्या खत बनवतात आणि त्या खताचा वापर परिसरातील रोपांना करतात.

स्थानिक लोकांच्या सहभागातून आणि मनपाच्या अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटच्या(एलएलएम)च्या सहभागातून 2009 साली त्यांनी पांडुरंग नाईक मार्ग रेसिडेंट असोसिएशन असे नाव ठेवत त्यांनी स्वच्छतेची मोहिम हाती घेतली. या परिसरात एकूण 10 इमारती आणि एक वाडी येते. तरी देखील या परिसरातून पालिकेला एएलएमकडून कमी प्रमाणात कचरा देण्यात येतो, अशी माहिती एएलएमचे अधिकारी सुभाष पाटील यांनी दिली.

स्थानिकांच्या सहभागामुळे आज हा परिसर सुंदर आणि हरित झाला आहे. परिसरातील 60 टक्के लोक ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवतात आणि ओल्या कचऱ्यापासून खत बनवून ते खत परिसरातील झाडांना वापरत असल्याची माहिती पांडुरंग नाईक मार्ग रेसिडेंट असोसिएशनच्या अध्यक्षा तसंनीम शुकूल यांनी दिली.

विशेष म्हणजे हा परिसर समुद्र किनारी असल्यामुळे खारी हवा या परिसरात वाहते. त्यामुळे सहसा अशा परिसरात हरितक्रांती करणं कठीण काम आहे. मात्र सेंद्रीय खत आणि लोकांच्या सहभागामुळे हे सगळं शक्य झाल्याचं वृक्षांची निगा राखणाऱ्या 42 वर्षीय बिंदुसार मळू जाधव यांनी सांगितलं. आज सरकार पोस्टरबाजी करून स्वच्छतेचे धडे देतंय मात्र दादर शिवाजी पार्कमध्ये एएलएमने गेल्या अनेक वर्षांपासून हे कार्य हातात घेऊन आधीच परिसर हरित बनवलाय.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा