Advertisement

गिरगाव चौपाटीवरील जेट्टीसाठी शिवसेनेला आठवले मराठी नाट्यगृह

पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई पोर्ट ट्रस्टकडून मास्टर प्लॅन बनवण्यात आला असून, यामध्ये गिरगाव चौपाटीवर धक्का (जेट्टी) बनवण्यात येणार आहे. त्यामुळे ही जेट्टी मरीन ड्राईव्हला जोडण्यासाठी बिर्ला क्रिडा केंद्रातील मोकळी जागा व येथील बांधीव इमारती यांच्या जागा प्रवाशांच्या येण्या-जाण्यासाठीच्या टर्मिनसकरता, प्रसाधनगृह, भांडार कक्ष व उपहारगृह तथा हॉटेल याकरता वापरता येणार आहे.

गिरगाव चौपाटीवरील जेट्टीसाठी शिवसेनेला आठवले मराठी नाट्यगृह
SHARES

गिरगाव चौपाटीवर मुंबई पोर्ट ट्रस्टकडून जेट्टी उभारण्यास पुन्हा एकदा शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. बिर्ला क्रिडा केंद्रातील नाट्यगृह बंद करून तिथे जेट्टी उभारता येणार नाही, असे शिवसेनेसह काँग्रेसनेही ठासून सांगितले. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी कोणत्याही नाटकाचा प्रयोग, तसेच नाटकांचे सराव होत नसून या जेट्टीला विरोध करण्यासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा मराठी नाटकांचा आधार घेत भाजपावर कडी केली आहे.


मुंबई पोर्ट ट्रस्टचा मास्टर प्लॅन

पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई पोर्ट ट्रस्टकडून मास्टर प्लॅन बनवण्यात आला असून, यामध्ये गिरगाव चौपाटीवर धक्का (जेट्टी) बनवण्यात येणार आहे. त्यामुळे ही जेट्टी मरीन ड्राईव्हला जोडण्यासाठी बिर्ला क्रिडा केंद्रातील मोकळी जागा व येथील बांधीव इमारती यांच्या जागा प्रवाशांच्या येण्या-जाण्यासाठीच्या टर्मिनसकरता, प्रसाधनगृह, भांडार कक्ष व उपहारगृह तथा हॉटेल याकरता वापरता येणार आहे.


जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव सुधार समितीकडे

बिर्ला क्रिडा केंद्राची ६ हजार ४७२ चौरस मीटर एवढी जागा आहे. त्यातील २ हजार ७९१ चौरस मीटरच्या जागेत बिर्ला क्रिडा केंद्राचे कार्यालय, सभागृह, तालीम कक्ष उभारण्यात आले आहे. तर उर्वरीत जागेवर गच्ची बगिचा व उपहारगृह आहे. त्यामुळे, यापैकी २ हजार ७९१ चौरस मीटरची जागा सरकार ताब्यात घेणार असून ही जागा हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव सुधार समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.


भाजप वगळता सर्वपक्षीय विरोध

मागील वेळी प्रत्यक्ष जागेची पाहणी करूनच यावर निर्णय घेतला जावा, असे सांगत राखून ठेवलेला प्रस्ताव सोमवारच्या बैठकीत मंजुरीला आला. यावेळी भाजपाचे प्रकाश गंगाधरे यांनी हा प्रस्ताव त्वरीत मंजूर करावा, अशी मागणी केली. पर्यटन, नोकरी, उद्योगधंदे आदीसाठी हा प्रस्ताव महत्वाचा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ही जेट्टी बनवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काँग्रेसचे जावेद जुनेजा यांनी विरोध करत जर याठिकाणी जेट्टी बनली, तर मराठी नाटकांचे एक नाट्यगृह बंद होईल, अशी भीती व्यक्त केली. ही जागा जेट्टीला देण्याची गरजच नसल्याचे शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी सांगितले.


कोळी बांधवांनी बोटी लावायच्या कुठे?

गरज सरो आणि वैद्य मरो, हा भाजपाचा स्वभाव आहे. त्यामुळे जेट्टीसाठी ते आपल्याकडे आले असले, तरी भविष्यात ते महापालिकेला विचारणार नाहीत. आधीच गिरगाव चौपाटीच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली कोळी लोकांची मासे व जाळी सुकवण्याची जागा काढून घेत त्यांना बेदखल केले आहे. त्यामुळे भविष्यात बहुउद्देशीय जेट्टी उभारल्यानंतर कोळी बांधवांच्या बोटी त्यांना तिथे लावता येणार का? याची प्रथम माहिती द्यावी आणि त्यानंतरच हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी केली. त्यामुळे अखेर हा प्रस्ताव पुन्हा एकदा राखून ठेवण्यात आला आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा