Advertisement

मालाच्या पुरवठय़ाअभावी उद्योगांना फटका

मालवाहू जहाजे मुंबईच्या बंदरात येत नसल्याने महिन्यापासून कंटेनर वाहतूक ठप्प होऊन वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत.

मालाच्या पुरवठय़ाअभावी उद्योगांना फटका
SHARES

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परदेशातून साहित्याचे कंटेनर घेऊन येणारी मालवाहू जहाजे मुंबईच्या बंदरात येत नसल्याने महिन्यापासून कंटेनर वाहतूक ठप्प होऊन वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. उत्पादनासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होत नसल्याने त्याचा फटका उद्योगांनाही बसतो आहे. कोरोना संसर्गाची स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचाः- मुंबईत उकाडा वाढला, कमाल तापमानात वाढ

मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये प्रामुख्याने चीन, हाँगकाँग, दुबई आणि कोरिया या देशांतून मालवाहू जहाजांच्या माध्यमातून साहित्याचे कंटेनर येतात. वाहन उद्योगातील साहित्याचा वाटा त्यात सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे फर्निचर आणि घरगुती साहित्य चीनमधून मोठय़ा प्रमाणावर येते. लिथिअम बॅटरीही मोठय़ा प्रमाणावर परदेशातून येते. एका जहाजामध्ये साधारणत: दोन ते अडीच हजार कंटेनर भरून साहित्य आणले जाते.या कंटेनरची राज्यात आणि देशाच्या विविध भागांत वाहतूक करण्यासाठी बंदरामध्ये दिवसभरात सात ते आठ हजार टेलर्स येत असतात. औद्योगिक क्षेत्र आणि व्यावसायिकांकडून करण्यात येत असलेल्या मागणीनुसार त्या-त्या देशातून साहित्याचा पुरवठा केला जातो. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कार्यकारी सदस्य आणि महाराष्ट्र राज्य प्रवासी आणि माल वाहतूकदर संघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यामध्ये मागणीनुसार बंदरात चार मोठी जहाजे येणे अपेक्षित होती. मात्र, ती अद्यापही आलेली नाहीत. त्यामुळे कंटेनरची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. सद्य:स्थितीत बंदरात येणारे ७0 टक्क्यांहून अधिक साहित्य बंद झाले आहे. याचा सर्वाधिक फटका सध्या वाहतूकदारांना बसतो आहे. साहित्याचा पुरवठाही बंद झाल्यामुळे उद्योगांनाही त्याचा फटका बसतो आहे. कंटेनर वाहतुकीसाठी लागणार्‍या ट्रेलरच्या किमती ८0 लाखांहून अधिक असतात. बहुतांश वाहतूकदार बँकेचे कर्ज काढून त्याची खरेदी करतात. हप्ते थकले आहेत.

हेही वाचाः- Coronavirus : हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर- नर्सेसच्या चाचण्या निगेटिव्ह

त्यामुळे वाहतूकदारांकडून देशाच्या अर्थमंत्र्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. बँकेचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी आणि त्याबाबतचे शासकीय आदेश काढावेत, अशी मागणी शिंदे यांनी अर्थमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. चीन, कोरिया, हाँगकाँग, दुबई आदी भागांतून साहित्याचे कंटेनर घेऊन येणारी जहाजे सध्या बंदरात येत नाहीत. त्यामुळे वाहतूकदारांसह उद्योजकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. धावणार्‍या सात ते आठ हजार कंटेनर ट्रेलरच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा