चालत्या ट्रेनच्या दरवाजाजवळ बसणं किंवा उभं राहणं याला “स्वतःहून केलेली इजा” (self-inflicted injury) मानता येणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय Bombay High Court ने दिला आहे. न्यायालयाने रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनलचा तो आदेश रद्द केला, ज्यात जखमी प्रवाशाला भरपाई नाकारण्यात आली होती.
Bombay High Court ने स्पष्ट केलं की, चालत्या ट्रेनच्या दरवाजाजवळ उभं राहणं किंवा बसणं हे स्वतःहून केलेलं (जाणूनबुजून केलेलं) दुखापत/इजा मानता येणार नाही.
न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी 31 जानेवारी 2018 च्या ट्रिब्युनलच्या निर्णयाविरोधातील अपील मंजूर केले. ट्रिब्युनलने हा दावा फेटाळताना प्रवाशाची इजा “स्वतःहून केलेली” असल्याचं म्हटलं होतं, जरी तो प्रवासी वैध तिकीटधारक (bona fide traveller) असल्याचं मान्य केलं होतं.नाशिकमधील रहिवासी रोहिदास बंडू खुमावत हे मनमाडहून जळगावकडे जाणाऱ्या गुवाहाटी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होते. दरवाज्याजवळील गर्दीमुळे घसरून ते चालत्या ट्रेनमधून खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि डाव्या पायाला दुखापत झाली.
ट्रिब्युनलच्या निष्कर्षाशी असहमती दर्शवत हायकोर्टाने म्हटलं की, अशा प्रकारे प्रवासी दरवाज्याजवळ उभा होता म्हणून त्याला निष्काळजी किंवा जाणूनबुजून इजा करणारा ठरवता येणार नाही. केवळ दरवाज्याजवळ उभं असणं म्हणजे निष्काळजीपणा किंवा स्वतःहून इजा करणं असं समजणं चुकीचं आहे.
न्यायालयाने स्पष्ट केलं की, अशा परिस्थितीत ट्रेनमधून पडणं हे रेल्वे कायद्यानुसार “अपघाती घटना” (untoward incident) मानलं जाईल, जोपर्यंत तो आत्महत्या किंवा गुन्हेगारी कृत्यासारख्या अपवादांमध्ये बसत नाही.
ट्रेन जळगाव स्टेशनवर थांबत नव्हती, या ट्रिब्युनलच्या मुद्द्यावर भाष्य करताना न्यायालयाने सांगितलं की, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये थांब्यांची स्पष्ट घोषणा नसल्याने प्रवासी गोंधळात किंवा घाबरून प्रतिक्रिया देऊ शकतात. अशा वेळी पूर्णपणे प्रवाशालाच दोष देणं योग्य नाही.
न्यायमूर्तींनी नमूद केलं की, “अशा परिस्थितीत कोणताही व्यक्ती स्वतःला जाणीवपूर्वक इजा करून घेईल असं वागणार नाही, आणि काही वेळा तो सुरक्षितही राहू शकतो.”
दरम्यान, ट्रिब्युनलने भरपाई नाकारताना असं म्हटलं होतं की, जळगाव येथे ट्रेन थांबत नसल्यामुळे संबंधित प्रवासी उतरायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे अपघातासाठी तो स्वतःच जबाबदार आहे. याविरोधात कुमावत यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं.
हेही वाचा
