Advertisement

राणीबागेत आता हाय-वे नाही तर स्काय-वे!


राणीबागेत आता हाय-वे नाही तर स्काय-वे!
SHARES

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातील (राणीबाग) मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्राण्यांच्या पिंजऱ्यांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. वाघ, सिंह, हरीण यासह इतर प्राण्यांचे पिंजरे बांधण्यासाठी मागवलेल्या निविदाच वादात अडकल्याने या पिंजऱ्यांचे बांधकाम रखडले होते. राणीबागेतील पेंग्विन पक्ष्यांचे पिंजरे उभारणाऱ्या हायवे कन्स्ट्रक्शन या कंपनीला हे काम मिळावे म्हणून आटोकाट प्रयत्न सुरु होता. परंतु, प्रत्यक्षात हाय वे कंपनी बाद झाली असून त्याऐवजी स्कॉय वे या कंपनीला काम मिळाले आहे. त्यामुळे आता राणीबागेतील वादग्रस्त हाय वे कन्स्ट्रक्शन नव्हे तर स्कॉय वेचे पिंजरे दिसणार आहेत.


दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ६९ कोटींचा खर्च

राणीबागेतील प्राणीसंग्रहालयातील पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. पेंग्विन पक्ष्यांसह राणीबागेचा दर्शनी भाग तसेच रुग्णालय इमारतीचे काम पूर्ण होत आहे. आता या प्राणीसंग्रहालयात वाघ, सिंह, सांबर, हरीण, नील गाय, चार शिंगी हरीण, काळवीट, बार्किंग हरीण(भेकरा) तसेच पक्ष्यांचा पिंजरा दोन यासाठी दर्शनी बांधकाम करण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ६९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

या पिंजऱ्यांमध्ये प्राण्यांचं रात्रीचं निवासस्थान बांधणे, प्राण्यांसाठी कसरतीचे आवार बांधणे, प्राणी पाहण्यासाठी गॅलरी बांधणे, प्रदर्शनी गॅलरीसाठी अॅक्रेलिक ग्लासचं बांधकाम करणे, प्राण्यांसाठी कृत्रिम जलाशय बांधणे, तारांपासून तयार केलेल्या दोरखंडाच्या जाळीचा पक्षी ठेवण्यासाठी पिंजरा बांधणे, लँडस्केपिंग करणे, प्राण्यांच्या राखणदारासाठी खोली बांधणे आदी प्रकारची कामे या पिंजरा बांधकामांमध्ये समाविष्ट आहेत.


हाय वे ते स्काय वे

यासाठी यापूर्वी मागवलेल्या निविदांमध्ये काही जाचक अटी टाकून एका ठराविक कंपनीलाच पात्र ठरण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु, यासाठी निविदा न आल्यामुळे पुन्हा नव्याने निविदा मागवण्यात आल्या होत्या. तसेच पेंग्विन पक्ष्याचा पिंजऱ्याचे बांधकाम करणाऱ्या हाय वे कन्स्ट्रक्शन या कंपनीने बोगस कागदपत्रे देऊनही त्यांना कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळे या कामाच्या आधारे त्यांना पात्र ठरवण्यात येणार होते, यालाही भाजपा, सपाच्या गटनेत्यांनी तीव्र विरोध केला होता.


राणीबागेची पाच कोटींची स्वच्छता!

पेंग्विन पक्ष्यांचे आगमन झाल्यापासून राणीबागेतील पर्यटकांची संख्या वाढू लागत असल्याचा दावा करण्यात येत असून यासाठी उद्यान व प्राणीसंग्रहालयातील स्वच्छता राखण्यासाठी हाऊस किपिंगचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यात येत आहे. यासाठी कल्पतरुज हॉस्पिटॅलिटी व फॅसिलिटी मॅनेजमेंट या कंपनीला हाऊसकिपिंगचे काम दिले जात आहे. पुढील दोन वर्षांकरता या कंपनीवर पाच कोटी ३० लाख रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे वर्षाला २ कोटी ६५ लाख रुपये केवळ राणीबागेची साफसफाई राखण्यासाठी खर्च केला जाणार आहेत. ही कंपनी नागपूरची असून यापूर्वी त्यांनी फक्त नागपूर रेल्वे स्थानकावरील चिकित्सा अधिक्षकांच्या कार्यालयातील हाऊस किपिंगचे काम केले आहे.



हेही वाचा

राणीबागेच्या विस्तारीत प्राणीसंग्रहालयाला ‘मफतलाल’चा खोडा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा