Advertisement

घाबरू नका! मुलुंडच्या 'या' शाळेत विद्यार्थ्यांसोबत सापही हजेरी लावतात!!


घाबरू नका! मुलुंडच्या 'या' शाळेत विद्यार्थ्यांसोबत सापही हजेरी लावतात!!
SHARES

महापालिकेच्या बेजबाबदारपणाचा कहर सध्या मुलुंडमधील सेवालाल ललवाणी हायस्कूलमध्ये बघायला मिळत आहे. या शाळेत महापालिकेच्या कृपेने विद्यार्थ्यांसोबतच विषारी साप देखील हजेरी लावत आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? पण हो ! आपल्याच महापालिकेने हे शक्य करून दाखवलं आहे.शाळेच्या पटांगणात विषारी साप

मुलुंड पश्चिमेकडील एस. एल. रोड येथील महापालिकेच्या सेवालाल ललवाणी शाळेच्या पटांगणातील पावसाळ्यात वाढलेले गवत २ महिने झाले तरी पालिकेने कापलेले नाही. हे गवत आणि झुडपे पटांगणात काही ठिकाणी १ ते दीड फूट आणि काही ठिकाणी २ ते ३ फूट इतके वाढले आहे. परिणामी शाळेच्या पटांगणात विषारी साप येण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे साप दिवसा गर्द झाडीत लपतात आणि रात्रीच्या वेळेस बाहेर पडतात. त्याचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच आसपासच्या नागरिकांना देखील होत आहे. या सापांमुळे शाळेत तसेच तेथील परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.गवत कापण्यासाठी कर्मचारी येईना

काही दिवसांपूर्वी महापालिकेचे कर्मचारी गवत कापण्यासाठी आले होते. गवत कापण्यासाठी ते गवतात शिरताच तिथून बरेच साप बाहेर पडले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी तिथून घाबरून पळ काढला. तेव्हापासून इथे वाढलेलं गवत कापण्यासाठी महापालिकेचा कुठलाही कर्मचारी आलेला नाही. महापालिकेने झटकले हात

हे साप रात्री आसपासच्या इमारतीत देखील शिरतात. आतापर्यंत २-३ वेळा सर्पमित्रांच्या साहाय्याने या सापांना पकडण्यात आलं. त्यामुळे महापालिकेने या प्रकाराची तात्काळ दखल घेत इथे वाढलेलं गवत कापावं, अशी मागणी येथील रहिवासी गीता शर्मा यांनी केली.

या संदर्भात महापालिकेच्या टी वाॅर्डातील अधिकारी ज्योती बकाणे यांना विचारणा केल्यास ''माझी आताच इथे नियुक्ती झाली झाली आहे. त्यामुळे मला आधी सर्व तपशील घ्यावा लागेल." असं उत्तर त्यांनी दिलं. या लालफितीच्या कारभारामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यास, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न पालक विचारू लागले आहेत. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा