Advertisement

महाविद्यालयाचे बांधकाम सोमय्या मैदानही गिळणार


महाविद्यालयाचे बांधकाम सोमय्या मैदानही गिळणार
SHARES

मुंबईत आधीच मोकळ्या जागांची कमतरता असताना शहर आणि पूर्व उपनगराच्या सीमारेषेला असलेल्या सोमय्या मैदानही जाणार आहे. मुंबईच्या 2014-34च्या विकास आराखड्यात या मैदानावरील मोकळ्या जागांचे आरक्षण जाऊन तिथे आता वैद्यकीय महाविद्यालय आणि होस्टेलचे आरक्षण टाकले गेले आहे. त्यामुळे राजकीय सभांसाठी शिवाजी पार्क मैदानाची आशा संपुष्टात आल्यानंतर एम.एम.आर.डी.ए चे मैदान आणि सोमय्या मैदानावर भिस्त होती. पण आता सोमय्या मैदानावर वैद्यकीय महाविद्यालयाचे आरक्षण आल्यामुळे हे मैदानही बांधकामात गिळले जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने बनविण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत लोकांच्या हरकती प्राप्त झाल्यानंतर या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नियोजन समितीची स्थापना केली गेली. महापालिकेचे तीन आणि सरकारचे तीन सदस्य असलेल्या या समितीने लोकांच्या हरकती आणि सूचना ऐकून त्याप्रमाणे बदल सूचवत आपला सुधारीत अहवाल सादर केला. परंतु या विकास आराखड्यात शीव चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर चक्क वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्टेलचे आरक्षण दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आजवर मोकळे असलेले मैदान आता आरक्षणामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामांनी गिळले जाणार आहे.


विरोधी पक्षनेते रवीराजा यांनी याला तीव्र विरोध दर्शविला असून महापलिका सभागृहात हे आरक्षण रद्द करून ते मैदान मोकळे ठेवण्याचा आपण प्रयत्न करू, असे स्पष्ट केले आहे. मी लहान असल्यापासून ही जागा मोकळी आहे. सध्या 1991 च्या विकास आराखड्यातही ती मोकळी जागाच दाखवली आहे. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी तसेच राजकीय सभा आणि कार्यक्रमांसाठी हे मैदान महत्त्वाचे मानले जाते. मुंबईतील एमएमआरडीए मैदानानंतर सोमय्या मैदान हे मोठ्या कार्यक्रमांसाठी आणि समारंभासाठी पसंतीचे ठिकाण आहे. त्यामुळे हे मैदान खुलेच राहावे, हीच आपली मागणी असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.

टॉवरसाठी 'इंडियन जिमखान्या'ची जागा रस्त्यावर
माटुंगा येथील इंडियन जिमखाना हा सर्वांत जुना असून या जिमखान्याच्या जागेवरही रस्त्याचे आरक्षण टाकून ही जागा कमी करण्याचा प्रयत्न महापालिकेने केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी केला आहे. जिमखान्याच्या शेजारी तीन मोठे टॉवर उभे राहिले आहेत. परंतु या टॉवरच्या शेजारी 9 मीटर लांबीचा रस्ता सोडणे बंधनकारक आहे. टॉवरने जागा न सोडल्यामुळे जिमखान्याची काही जागा कमी करून ती रस्त्यासाठी वापरण्यात येणार आहे. मात्र, आपला याला तीव्र विरोध असल्याचेही रवि राजा यांनी स्पष्ट केले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा