
दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागांतील रहिवाशांनी नेपियनसी रोड, मालबार हिल आणि ब्रीच कँडी येथील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. महापालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
संयुक्त निवेदनात नागरिकांनी नमूद केले की, ब्रीच कँडी हा शहरातील सर्वात जुना निवासी परिसर आहे. येथे अनेक इमारती, मंदिरे, रुग्णालये, शाळा, बँका, व्यावसायिक आस्थापने तसेच फेरीवाले आणि हातगाडीवाले मोठ्या प्रमाणावर आहेत. याशिवाय, कोस्टल रोड इंटरचेंज आणि प्रस्तावित 250 गाड्यांच्या भूमिगत पार्किंग प्रकल्पामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे.
रहिवाशांच्या मते, वाहतूक कोंडी अत्यंत गंभीर पातळीवर पोहोचली असून, अवघ्या 2 किमी अंतर पार करण्यासाठी सध्या गर्दीच्या वेळी 30 ते 45 मिनिटे लागतात. ब्रीच कँडीच्या अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूंनी दररोज होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे या प्रीमियम भागातील जीवनमानावर मोठा परिणाम झाला आहे.
नागरिकांनी संभाव्य उपाय म्हणून असे सुचवले आहे की, नेपियनसी रोड येथे कोस्टल रोडसाठी अतिरिक्त प्रवेश आणि निर्गमन मार्ग तयार करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे, ज्यामुळे आसपासच्या बागा किंवा इमारतींना कोणताही फटका बसणार नाही. त्यांनी असेही सांगितले की, 2017 च्या आराखड्यात हा प्रवेशबिंदू प्रस्तावित होता. मात्र काही अज्ञात कारणांमुळे तो अद्याप वापरात आलेला नाही.
नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ला तातडीने या अतिरिक्त प्रवेश/निर्गमन मार्गाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या टाटा गार्डन प्रवेशाव्यतिरिक्त हा मार्ग सुरू केल्यास मालबार हिल, नेपियनसी रोड आणि ब्रीच कँडी येथील रहिवाशांना कोस्टल रोडशी थेट जोडणी मिळेल आणि वाहतूक कोंडी कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
याशिवाय, रहिवाशांनी यासाठी एक याचिका सुरू केली असून, अधिकाधिक नागरिकांनी या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे, जेणेकरून या भागातील राहणीमान पुन्हा सुरळीत होईल.
हेही वाचा
