‘एसआरए’कडे महापालिकेचे 1200 कोटी थकीत

  Mumbai
  ‘एसआरए’कडे महापालिकेचे 1200 कोटी थकीत
  मुंबई  -  

  मुंबई महापालिकेच्या जमिनीवर राबवण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (एसआरए ) योजनेतंर्गत महापालिकेला जमीन अधिमूल्यापोटी तसेच विकास शुल्कापोटी सुमारे 1200  कोटींची रक्कम देणे थकीत आहे. ‘एसआरए’ने ही रक्कम देण्याची 2014 मध्ये' तयारी दर्शवूनही केवळ सरकारने आदेश न दिल्यामुळे महापालिकेचे 1200 कोटी रुपये ‘एसआरए’कडे पडून आहे. त्यामुळे जकात कर बंद झाल्यामुळे ही थकीत रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाल्यास महापालिकेला मोठा आधार ठरणार आहे.

  मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवले जात असून त्यातील बहुतांश प्रकल्प हे महापालिकेच्या जागेवर उभे राहिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या जागेवर ‘एसआरए’प्रकल्प उभा राहिल्यास त्या जमीन अधिमूल्याची रक्कम महापालिकेला दिली जाते. परंतु मागील अनेक वर्षांपासून ही रक्कम महापालिकेला देण्यात आलेली नाही.


  सुधार समिती अध्यक्षांची मागणी

  जमीन अधिमूल्यासोबतच विकास शुल्क, पायाभूत सुविधा रक्कम अशाप्रकारे तब्बल 1200 कोटी रुपयांची थकीत रक्कम असल्यामुळे सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे पत्रव्यवहार करून एसआरएकडून ही थकीत रक्कम मिळावी म्हणून पाठपुरावा केला आहे.


  ‘एसआरए’ला भरावा लागतो आयकर

  महापालिकेला देणे असलेल्या 981.99 कोटी रुपये व म्हाडाला देणे असलेल्या 191.02 कोटी अशाप्रकारे अतिरिक्त रकमेवरच ‘एसआरए’ला आयकर भरावा लागत आहे. त्यामुळे या रकमा त्यांना देण्याची तयारी ‘एसआरए’ने दर्शवली होती. परंतु याबाबत अद्यापही शासनाचा निर्णय प्रलंबित आहेत.त्यामुळे सुधारीत आदेश प्राप्त झाल्यानंतरच जमीन अधिमूल्य रक्कम महापालिकेकडे वर्ग करण्याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे ‘एसआरए’ने  महापालिकेला कळवले आहे.


  रक्कम बेस्टला देता येईल

  ‘एसआरए’कडे महापालिकेची एकूण 1253 कोटी रुपयांची थकीत रक्कम आहे. ही रक्कम त्यांनी त्वरीत दिल्यास बेस्ट उपक्रमाला देता येईल, असे सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी म्हटले आहे. जकात रद्द होऊन जीएसटी लागू झाले. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न कमी होणार आहे. त्यामुळे ही थकीत रक्कम मिळाल्यास महापालिकेला एकप्रकारे आधार मिळेल आणि हीच रक्कम तोट्यातील बेस्टला बाहेर काढण्यासाठी वापरता येईल. सरकार बेस्टला काही मदत करत नाही. त्यामुळे किमान ‘एसआरए’कडे असलेली थकीत रक्कम मिळण्यासाठी शासनाने तशाप्रकारे आदेश त्वरीत पारित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.