Advertisement

मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार, निवडणूक आयोगाने दिली परवानगी

कोरोनाचा धोका काय़म असल्याने मुंबई पालिकेच्या निवडणुकीबाबत काय तयारी करावी असं पत्र पालिकेने राज्य निवडणुक आयोगाला पाठवलं होतं.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार, निवडणूक आयोगाने दिली परवानगी
SHARES

मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक (Mumbai Municipal Corporation elections) फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. कोरोनामुळे ह्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता ठरल्या वेळेप्रमाणे मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation) निवडणूक होणार आहे. ही निवडणूक घेण्यासाठी तयारीला लागण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने (state election commission) पालिकेला दिले आहेत.

राज्य निवडणुक आयोग व मुंबई महापालिका निवडणूक विभागाची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. ह्या तयारीची सुरूवात प्रभागाच्या फेररचनेपासून केली जाणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आधी कोरोनामुळे राज्यातील काही पालिकांच्या निवडणुका वर्षभरापासून लांबणीवर पडल्या आहेत. कोरोनाचा धोका काय़म असल्याने मुंबई पालिकेच्या निवडणुकीबाबत काय तयारी करावी असं पत्र पालिकेने राज्य निवडणुक आयोगाला पाठवलं होतं. त्यानुसार सोमवारी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुनील धामणे, संगीता हसनाळे यांची ऑनलाइन बैठक झाली. 

 बैठकीत पालिका निवडणुकीची तयारी सुरु करायला सांगण्यात आले असून याची सुरुवात प्रभागाच्या फेररचनेपासून सुरवात होणार आहे. या प्रक्रियेनंतर प्रभागांचे आरक्षण, मतदार यादी अंतिम झाल्यानंतर बुथ निश्‍चित करण्यात येतील. असे राज्य निवडणुक आयुक्त यु.पी. स. मदान यांनी सांगितले. 

कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे राज्य सरकार निवडणुकीबाबत निर्णय घेईल, असे स्पष्ट करत आयोगाने सन २०११ च्या जनगणनेनुसार वॉर्डांची पुनर्रचना करण्याचे निर्देश दिले आहेत.  दरम्यान, ओबीसींच्या जागांवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता असून ५० टक्के मर्यादेच्या पलीकडे ओबीसी आरक्षणाच्या जागा जात असल्यास त्या जागा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे खुल्या वर्गात जातील, याकडे आयोगाने लक्ष वेधले आहे.

कोरोनामुळे २०२१ ची जनगणना होऊ शकलेली नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्येनुसार वॉर्डांची पुनर्रचना होणार आहे. पुनर्रचनेनंतर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. २०१७मध्ये केलेल्या वॉर्ड पुनर्रचनेत काही त्रुटी राहिल्या असल्यास या निवडणुकीत दुरुस्ती करून घेण्यास सांगितले असून ही पुनर्रचना अधिकाधिक निर्दोष व्हावी, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग रचना करण्यात आली. यावेळी शहर विभागातील सात प्रभाग कमी झाले होते. तसेच चेंबूर, घाटकोपर, भांडूप विक्रोळी वांद्रे पूर्व या भागातील प्रत्येक १ प्रभाग घटला होता. तर उत्तर मुंबईतील गोरेगाव, दहिसर येथील प्रत्येकी १ आणि मालाड कांदिवली येथील प्रत्येकी दोन असे प्रभाग वाढले होते.



हेही वाचा - 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज

  1. मुंबई, ठाण्यातील सर्व दुकानं खुली
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा