मुलांचे कुपोषण रोखणारा की कंपन्यांचे पोषण करणारा आहार?

Mumbai
मुलांचे कुपोषण रोखणारा की कंपन्यांचे पोषण करणारा आहार?
मुलांचे कुपोषण रोखणारा की कंपन्यांचे पोषण करणारा आहार?
मुलांचे कुपोषण रोखणारा की कंपन्यांचे पोषण करणारा आहार?
See all
मुंबई  -  

महाराष्ट्रात कुपोषणग्रस्त बालकांचे प्रमाण 35 ते 40 टक्के आहे. त्यातच महाराष्ट्र शासनाने तीव्र कुपोषणग्रस्त मुलांचे वजन वाढवण्यासाठी ‘ईझी नट पेस्ट पाकीट’चा प्रस्ताव आणला आहे. या पेस्ट पाकिटातून मुलांना फक्त शेंगदाण्याची पेस्ट दिली जाणार आहे. पण, याचा कोणताही आहारशास्त्रीय अभ्यास न करता या पेस्टचे वाटप मुलांच्या जीवावर बेतणारे आहे, अशी भीती आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सरकारच्या याच प्रस्तावाचा ‘जन आरोग्य अभियान’ आणि ‘अन्न अधिकार अभियाना'ने निषेध व्यक्त केला आहे. मुलांचे कुपोषण रोखणारा आहार आहे की कंपन्यांचे पोषण करणारा हा आहार आहे? असा प्रश्न देखील याअनुषंगाने विचारण्यात येत आहे.

आतापर्यंत 3 वर्षांपेक्षा लहान मुलांना टीएचआर म्हणजेच टेक होम रेशन (गहू, सोयाबीन आणि चणा) यांच्या मिश्रणापासून उपमा किंवा गोड शिरा तयार केला जातो. हाच पूरक पोषक आहार दिला जात असे. पण, पोषक हक्क गटाने केलेल्या सर्वेक्षणानुसार टीएचआर आहार खाण्याचे प्रमाण हे केवळ 5% आहे. तर, 95% टीएचआर आहार हा एकतर फेकून दिला जातो किंवा जनावरांना दिला जातो. त्यामुळे आधीच पाकिटातील आहाराचा सरकारला हा अनुभव असताना पुन्हा एकदा पेस्ट पाकीट हा पर्याय सुचवणे ही अजून गंभीर बाब आहे.

पूर्णिमा उपाध्याय, खोज सामाजिक संस्था, मेळघाट

'ईझी नट पेस्ट पाकीट' या योजनेसाठी जवळपास 100 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. तर, सरकारने 18 कोटी रुपयांची ग्राम बाल विकास केंद्र योजना परवडत नसल्याकारणाने अर्ध्यातच गुंडाळली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले असल्याचा आरोपही अभियानातर्फे करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. त्यावेळी सामोर आलेले धक्कादायक वास्तव म्हणजे, 14 पैकी केवळ 2 बालके साधारण श्रेणीत आली आणि इतर बालके कुपोषित राहिली. 14 मुलांपैकी 6 मुलांना जास्त काळ पेस्ट देण्यात आली होती. त्यातील फक्त एक मूल साधारण श्रेणीत आले. 4 तीव्र कुपोषित मुलांना 5 ते 8 आठवडे पेस्टची पाकीटे देऊनही ती मुले त्याच श्रेणीत राहिली.


सरकारला या योजनेचा सकारात्मक अनुभव नाही. तरीही सरकार ही योजना आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. पेस्ट युक्त आहार कुपोषित मुलांना देणे योग्य नाही. हे नंदुरबारच्या अनुभवातून कळते. तरी देखील सरकारच्या या अट्टहासाचे नेमके कारण कळत नाही.
डॉ. अभय शुक्ला, जनआरोग्य अभियान

ईझी नट पेस्ट पाकिटाच्या आहारातील त्रुटी -

  • एका वेळी मूल पाकिटातला पूर्ण आहार खात नाही
  • उरलेले पाकीट फेकून द्यावे लागते
  • पेस्टची पाकिटे जोपर्यंत सुरू असतात, तोपर्यंतच बाळाचे वजन थोडे वाढते, नंतर परत वजन कमी व्हायला सुरुवात होते
  • दिवसाला दिलेली पेस्टची पाकीटे संपल्याशिवाय दुसरा कोणताही आहार मुलाला देता येत नाही
  • पेस्टची सवय अगदी व्यसनासारखी आहे, मुले पेस्ट खाण्यासाठी हट्ट करतात, घरचा ताजा शिजवलेला आहार मुले खात नाही
  • सतत पेस्ट पाकीट खाल्ल्याने मुलांना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू होतो
  • एका पेस्ट पाकिटाची किंमत 25 रुपये एवढी आहे. दिवसातून 3 वेळा ही पेस्ट मुलांना द्यायची आहे. त्यामुळे दिवसाला एका बालकासाठी 75 रुपये खर्च केले जाणार आहेत

आदिवासी कुपोषित मुलांना ताजा आणि सकस आहार दिला, तरच राज्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी होईल. पण, जिथे हाताला कामच नाही, असे गरीब आदिवासी दोन वेळचे अन्न कसे विकत घेणार? आणि कसे खाणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.