मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गटांना अखेर आर्थिक बळकटी मिळाली आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महिला बचत गटांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात 15 हजार रुपयांची वाढ करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महिला बचत गटांना 10 हजार रुपयांऐवजी 25 हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे.
महिला बचत गटांना पालिकेकडून अनुदान विषयक अर्थसंकल्पीय तरतुदीतून बचत गटांच्या सभासद संख्येवर आधारित अनुदान दिले जाते. गेल्या वर्षी प्रती सभासद रुपये एक हजार इतके अनुदान देण्यात आले होते. यंदा अऩुदानात दुप्पट वाढ करण्यात अाली आहे. त्यामुळे बचत गटांना आता प्रति सभासद रुपये दोन हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. ज्या गटांचे राष्ट्रीयकृत बॅंकेत वा सारस्वत बॅंकेत खाते उघडून सहा महिने झाले आहेत. तेच गट या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. अनुदान मिळवण्यासाठी बचत गटांना पालिकेच्या विभाग कार्यालयातील नागरी दारिद्रय निर्मूलन कक्षाशी संपर्क साधावा लागेल.