Advertisement

शिवसेनेच्या नाकावर टिच्चून बंद यशस्वी

जो बंद झाला तो सर्व देशातील, या शहरातील लोकांनी पाहिला. नव्हे तर अनुभवलाय. आम्ही या बंदमध्ये सामील झालो तरच बंद होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेसह इतर पक्षांना विचारतोय कोण? असा समज काही शिवसेनेच्या काही धुरिणांनी केला होता. परंतु शिवसेनेच्याही नाकावर टिच्चून विरोधकांनी बंद यशस्वी करून दाखवला.

शिवसेनेच्या नाकावर टिच्चून बंद यशस्वी
SHARES

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षांनी पुकारलेला भारत बंद यशस्वी झाला की अयशस्वी झाला यावरून आता सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांमध्ये खलबते सुरु झाली अाहेत. काहींनी तर हा बंद म्हणावा तसा झालाच नाही, असं सांगूनही टाकलं. पण बंद यशस्वी झाला किंवा नाही, हे ठरवण्याठी सत्ताधारी पक्षाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.

बंद मोठ्या बदलाचं द्योतक

जो बंद झाला तो सर्व देशातील, या शहरातील लोकांनी पाहिला. नव्हे तर अनुभवलाय. आम्ही या बंदमध्ये सामील झालो तरच बंद होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेसह इतर पक्षांना विचारतोय कोण? असा समज काही शिवसेनेच्या काही धुरिणांनी केला होता. परंतु शिवसेनेच्याही नाकावर टिच्चून विरोधकांनी बंद यशस्वी करून दाखवला. सर्व विरोधक या इंधन दरवाढीच्या निषेध करण्यासाठी एकत्र आले आणि बंदही यशस्वी झाला. येणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकत्र येवून दाखवलेला बंद हा मोठ्या बदलाचं द्योतक आहे.


संपूर्ण देशात बंद 

भारत बंदचा परिणाम संपूर्ण देशात दिसून आला. दिल्ली असो महाराष्ट्र सर्वत्रच कडकडीत बंद पाळला गेला. उत्तर भारतात प्रभाव दिसला, पण महाराष्ट्रात या बंदचा परिणाम दिसला नाही, असं शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. खरं तर संजय राऊतांनी सामनाच्या कार्यालयातील त्या कॅबिनमधून बाहेर पडून महाराष्ट्र सोडा हो, साधे दादर आणि प्रभादेवीत जरी झाकून पाहिलं तरी बंद काय होता, हे दिसलं असतं. आमचा पक्ष नाही ना सामील झाला, मग बंद यशस्वी कसा काय होऊ शकतो, ही जी काही शिवसेनेची भावना आहे, ती शिवसेनेने काढून टाकायला हवी. 


शिवसेनेची जागा मनसेकडं

एक काळ असा होता, की शिवसेनेची ताकद होती, दहशत होती. परंतु ती ताकद आता राहिलेली नाही. भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसल्यानं ही त्यांची ताकद कमी झालीय. आणि मनसे विरोधकांसह सामील झाल्याने शिवसेनेला हा बंद यशस्वी वाटणारच नाही. परंतु मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आक्रमक होतेच, पण त्याबरोबरच मनसेही तेवढीच आक्रमक होती. शिवसेनेची जागाच मनसेने घेतली होती.


शिवसेनेला भुमिका नाही

भाजपासोबत राहिलो तर आपलं भविष्य आहे, असं सध्या शिवसेनेला वाटत आहे. त्यामुळे वारंवार राजीनामा देण्याच्या इशारा द्यायचा आणि पुन्हा मंत्र्यांचे राजीनामे चुरगळा करून खिशात सारायचे हेच सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषेत बोलायचं झालं तर शिवसेनेला आता कुठलीच भूमिका राहिलेली नाही. केवळ पैशांनी कामे करायची एवढाचा त्यांचा काही तो धंदा उरलाय. एवढ्या जाहीरपणे राज ठाकरे बोललेत.


खरा चेहरा जनतेसमोर 

जी शिवसेना इंधन दरवाढीच्या निषेधाचा फलक लावते, २०१५ आणि २०१८ च्या इंधन दरवाढीचा फरकांची आकडेवारी जनतेसमोर मांडते, ती शिवसेना प्रत्यक्षात विरोधकांच्या भारत बंद आंदोलनात सामील का होत नाही? असा कोणता दबाव शिवसेनेवर आहे. एकीकडे शिवसेना इंधन दरवाढीचा निषेध करतेय, सोशल मिडियावरून भाजपाचा समाचार घेतेय आणि याच सरकारच्या मुख्यमंत्र्यांसमवेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सिध्दीविनायक मंदिरात एकत्र मांडीला मांडी लावून बसतात. त्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे.


कमळाबाईच्या पदराआड 

किमान बाप्पाच्या मंदिरात तरी उध्दव ठाकरेंनी खरं बोलावं. महागाईच्या मुद्दयावरून देश पेटून उठलाय आणि देवाच्या मंदिरात बसून या दोन्ही पक्षाचे नेते मजा घेत आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनेला महागाईविरोधात बोलण्याचा अधिकार नाही. शिवसेनेला जनतेने कधीही माफ करू नये. खुद्द शिवसेनेला हा निर्णय पटलेला नाही. हा बंद काही केवळ राजकीय पक्षांनी पुकारलेला नव्हता, तर व्यापाऱ्यांचाही होता. सणाचे दिवस असतानाही मिळणाऱ्या चार पैशांवर पाणी सोडून, त्यांनी या बंदमध्ये सामील होत एकजुटीचं दर्शन घडवलं. महागाईचा फटका सर्वांनाच बसतो. पण शिवसेनेला केवळ आणि केवळ राजकारणापलीकडं काहीच दिसत नाही. दिल्लीच्या एका फोनवर, मातोश्रीचा आवाज बंद होतो. मग असे किती दिवस कमळाबाईच्या पदराआड शिवसेना लपणार आहे, असा सवाल आज या महाराष्ट्रातील जनता करत आहेत.


मनसेची भिती

आम्हाला महागाईत होरपळणाऱ्या जनतेविषयी सहानभुती आहे. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारात आकांडतांडव केले. विरोधी पक्षांचं ओझं आजपर्यंत आम्ही वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. मग भारत बंदच्या माध्यमातून पाहिली का विरोधी पक्षांची ताकद? शिवसेनेला आता विरोधी पक्षाच्या ताकदीचा अंदाज आलाय. पण बंद यशस्वी झालाय हे सांगण्याचं मोठेपण त्यांच्याजवळ नाही. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची भीती नाही तर भीती वाटते ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची.


शिवसेनेच्या पोटात शूळ 

कालपर्यंत मनसेचे गड राहिलेत कुठे असं म्हणणाऱ्या शिवसेनेला बंद काय असतो आणि तुमच्याशिवाय तो कसा यशस्वी करून शकतो हे मनसेने दाखवून दिलंय. मुलुंडमध्ये उपाध्यक्ष अनिषा माजगावकर असो, वा द्रुतगती महामार्ग बंद पाडणारा कर्णा दुनबळे असो वा मेट्रो बंद पाडणारा अंधेरीचा विभागअध्यक्ष संदेश देसाई असो वा बंदला विरोध करणारा भाजपा नगरसेवक विनोद मिश्रा यांचं कार्यालय फोडणारा बिजू बोरा असो, कुणाकुणाचं म्हणून नाव घेऊ. केवळ मुंबईत नाही तर डोबिंवली, नवी मुंबई, नागपूरसह अनेक शहरांमध्ये मनसेने जो काही पुढाकार घेतला होता, तो काँग्रेसपेक्षाही आक्रमक होता. मनसेच्या या आक्रमकतेमुळे शिवसेनेच्या पोटात शूळ निर्माण होणारच.


नेते एकाच ठिकाणी

देशभरातील ३१ पक्षांनी एकत्र येवून हा बंद पुकारला होता. यामध्ये काँग्रेस प्रमुख पक्ष होता. हातात हात घालून सर्व काँग्रेस नेते एकत्र येत बंद यशस्वी करण्यासाठी झटलेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अंधेरीत आंदोलन केलं. भारत बंदचं आंदोलन असताना प्रदेशाध्यक्ष यांनी मुंबईत आंदोलन करणं आणि त्यातच मुंबई अध्यक्षांसोबत हेही थोडंस खटकणारं होतं. या सर्व नेत्यांनी विविध भागांमध्ये आंदोलन केली असतं तर काँग्रेस कार्यकत्यांच्या अंगात शंभर हत्तीचं बळ आलं असतं. परंतु तसं कुठंही झालेलं दिसलं नाही.


भविष्यात हिंसक अांदोलन

सणाच्या मुहूर्तावर हे आंदोलन झाल्यामुळे थोडीशी नाराजी जनतेमध्ये दिसत होती. मात्र हे आंदोलन पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात असल्याचं समजल्यानंतर नागरिकही याला पाठिंबा देताना दिसत होता. या बंदमुळे शिव्यांची लाखोली जनतेनं वाहिली असं ऐकायला मिळाली नाही. पण आपण या बंदमध्ये सामील झालो नाहीत, आपल्याशिवाय हा बंद यशस्वी कसा होऊ शकतो, याचा विचार शिवसेनेने करायला हवा. जो संताप होता तो आज व्यक्त झाला. बंद शांततेत पार पडला. सण असल्यामुळे कुठेही याला हिंसक वातावरण लागणार नाही याची काळजी विरोधी पक्षांनी घेतली. या आंदोलनानंतर जर इंधनाचे दर कमी झाले तर ठीक नाहीतर भविष्यात जी आंदोलनं होतील ती हिंसक असतील, यात शंका नाही.


प्रश्न कोण सोडवणार ?

 इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेत. ते थांबवणं जर सरकारच्या हातात नाही तर मग ते थांबवणार कोण? या वाढत्या इंधनांच्या दरामुळे विरोधकांची माथीही भडकली जात आहेत. त्यांची मनगटे पेटली जात आहे. जनताही आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. कधी एकेकाळी याच इंधनाच्या मुद्यावरून जे सध्या सत्तेवर बसलेत त्या भाजपावाल्यांनी तत्कालीन सरकारविरोधात तीव्र आंदोलनं केली होती. पण त्याच मुद्दयावरून आता विरोधक आक्रमक होत असताना भाजपाला तो प्रश्न सोडवता येत नाही. मग जनतेचे प्रश्न सोडवणार कोण, हाच सवाल सध्या सर्वांनाच पडलेला आहे.



हेही वाचा- 

देशभरातल्या औषध विक्रेत्यांचा २८ सप्टेंबरला बंद

सिद्धार्थ संघवीची हत्या कार्यालयाच्या पार्किंगमध्येच




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा