Advertisement

देशभरातल्या औषध विक्रेत्यांचा २८ सप्टेंबरला बंद

केंद्र सरकारने नुकताच ई-फार्मसीचा अंतिम मसुदा प्रसिद्ध केला आहे. या मसुद्याला विरोध करण्यासाठी २८ सप्टेंबरला देशभरातील अंदाजे साडे आठ लाख औषध दुकानं बंद असतील, अशी माहिती 'महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन'चे सचिव अनिल नावंदर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

देशभरातल्या औषध विक्रेत्यांचा २८ सप्टेंबरला बंद
SHARES

ई-फार्मसीला अधिकृत मान्यता देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नुकताच ई-फार्मसीचा अंतिम मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार ई-फार्मसीवर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र या ई-फार्मसीमुळे मुंबईसह देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्टच्या पोटावर पाय येईल. नशेचा-गर्भपाताचा बाजार वाढेल, चुकीची औषधं दिली जातील आणि रूग्णांच्या जिवाला धोका निर्माण होईल, असं म्हणत या निर्णायविरोधात फार्मासिस्टबरोबरच औषध विक्रेतेही आक्रमक झाले आहेत. या निर्णयाला विरोध करण्यासाठी २८ सप्टेंबरला देशभरातील अंदाजे साडे आठ लाख औषध दुकानं बंद असतील, अशी माहिती 'महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन'चे सचिव अनिल नावंदर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


कायदा काय सांगतो?

सध्या ज्या प्रमाणे सर्व वस्तू आॅनलाईन उपलब्ध होतात; त्या प्रमाणे औषधही आॅनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी आॅनलाईन कंपन्यांनी ई-फार्मसी सुरू केली. पण ई-फार्मसीला अधिकृत मान्यता नसल्याने ई-फार्मसीचा मुद्दा एेरणीवर आला. चुकीची वा बनावट औषधं रूग्णापर्यंत गेली, तर त्याचा विपरित परिणाम रूग्णावर होऊ शकतो. त्यामुळे औषधं नेहमीच फार्मासिस्टच्या उपस्थितीत आणि डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनंच देण्यात यावी, असा कायदा आहे. अशात आॅनलाईन औषध उपलब्ध होऊ लागल्याने त्याला औषध विक्रेते आणि फार्मासिस्टनी विरोध सुरू केला.


म्हणून विरोध

ई-फार्मसीमुळे शेड्युल एच, शेड्युल एच/ वन मधील झोपेची आणि गर्भपाताची औषधं सहजपणे उपलब्ध झाल्यास त्याचा जनआरोग्यावर विपरित परिणाम होईल. नशेचा आणि गर्भपाताचा बाजार वाढवून सामाजिक आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील, असं म्हणत हा विरोध करण्यात येत आहे.

त्याचवेळी कडक कायद्यानुसार औषध विक्रेत्यांवर अनेक बंधन असताना, अन्न आणि औषध प्रशासनानं नियंत्रण असताना ई-फार्मसीवर तसं कोणतंही कडक बंधन दिसून येत नसल्याचं औषध विक्रेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ई-फार्मसी जनआरोग्यासाठी आणि औषध विक्रेते-फार्मासिस्टच्या व्यवसायाच्या दृष्टीनं घातक असल्याचं म्हणत औषध विक्रेते आक्रमक झाल्याचही नावंदर यांनी सांगितलं.


कधी राहणार बंद?

हा विरोध व्यक्त करण्यासाठी २८ सप्टेंबरच्या रात्री उशीरा १२.०० वाजल्यापासून पुढचे २४ तास औषध विक्रेत्यांचा बंद असणार आहे. या बंदात महाराष्ट्रातील ५५ हजार औषध विक्रेत्यांसह देशभरातील अंदाजे साडे आठ लाख औषध विक्रेते सहभागी होतील, असंही नावंदर यांनी सांगितलं आहे. या बंदमुळे रूग्णांची गैरसोय होणार नाही यादृष्टीनं रूग्णांनी आवश्यक ती औषधं अाधीच खरेदी करावीत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.



हेही वाचा-

ई-फार्मसीचा मार्ग मोकळा? अंतिम मसुदा जाहीर

आॅनलाईन फार्मसीचा मार्ग मोकळा, अंतिम आराखड्याला मंजुरीची प्रतिक्षा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा