सिद्धार्थ संघवीची हत्या कार्यालयाच्या पार्किंगमध्येच


सिद्धार्थ संघवीची हत्या कार्यालयाच्या पार्किंगमध्येच
SHARES

एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह अखेर पाच दिवसानंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. कल्याणमधील हाजीमलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. व्यावसायिक यशातील चढाओढीतून ही हत्या झाल्याचं समजतं.


हत्या कशामुळे?

एचडीएफसीच्या लोअर परळ येथील शाखेत 2007 मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) म्हणून सिद्धार्थ संघवी बँकेत रुजू झाले. आपल्या कामाच्या जोरावर संघवी बँकेच्या उपाध्यक्षपदवर पोहचले. 11 वर्षांच्या कालावधीत त्यांना तीन वेळा मिळालेल्या पदोन्नतीमुळे सहकाऱ्यांचा जळफळाट होत होता.


कोणी केली हत्या?

यातूनच सहकार्यांनी त्याचा काटा काढण्याचा कट रचला. बुधवारी सायंकाळी संघवी कंपनीच्या पार्किंगमध्ये असताना आरोपींनी त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून कल्याणच्या हाजीमलंग रोडवरील काकडवाल गावाजवळ फेकून दिला. संघवीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार घरातल्यांनी नोंदवल्यानंतर पोलिस कामाला लागले.

तपासात या प्रकरणात हत्येचा संशय असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्या अनुशंगाने तपास सुरू केला. या हत्येच्या संशयाप्रकरणी पोलिसांनी संघवी यांचे साथीदार आणि चालक अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.


सहकाऱ्यांनी केली हत्या

सिद्धार्थ यांची हत्या केल्याची कबुली चौघांपैकी एकानेच पोलिसांकडे दिली होती. चौघा संशयितांपैकी दोघेजण सिद्धार्थ यांचे सहकारी आहेत, तर एक कॅब चालक आणि एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. 20 वर्षीय कॉन्ट्रॅक्ट किलर रईस उर्फ सर्फराझ शेखने सिद्धार्थ यांचा मृतदेह कल्याणजवळ पुरल्याची माहिती दिली होती. पोलिसांना संघवी यांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये रक्ताचे वर्ण दिसून आले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने हे सर्व पुरावे ताब्यात घेतले असून त्या दृष्टीकोनातून तपास सुरू केला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा