बर्ड फ्लूमुळेच ठाण्यातील १५ बगळ्यांचा मृत्यू झालाचं उघड झालं आहे. त्यामुळे ठाणे महापालिका सतर्क झाली असून पालिकेने मंगळवारपासून शहरातील चिकन शॉपच्या सर्व्हेला सुरुवात केली आहे. यामध्ये ६०० हून अधिक चिकन शॉपच्या सर्व्हेक्षणाचं काम हाती घेण्यात आलं आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना चिकन शॉपच्या सर्व्हेक्षणाची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार चिकन शॉपमधील कोंबड्याचा सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. यामध्ये कोबंड्यांना काही आजार आहे का?, मृत कोंबड्या कुठे आहेत का? याची पाहणी केली जाणार आहे. सर्व्हेक्षणात कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्यास त्यांचे नमुने तपासणी करुन शासनाच्या निर्देशानुसार त्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले आहेत.
मागील आठवड्यात ठाण्यातील घोडबंदर भागात १६ पक्षाचा मृत्यू झाला. त्यामध्ये पाणबगळे,पोपट,गिधड आणि त्यानंतर कावळ्याच्या देखील समावेश होता. या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्यानंतर या सर्व पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाली आहे. आयुक्त डॉ. शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची तसेच आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार शहरातील चिकन शॉपचा सर्व्हेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. शहरातील ६०० चिकन शॉपचा सर्व्हे करण्याचे काम ९ प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकामार्फत सुरु झालं आहे. चिकन शॉपचा सर्व्हे करणारी राज्यातील ठाणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली आहे.