Advertisement

मुंबईच्या किमान तापमानात वाढ

गुरुवारी मुंबईच्या किमान तापमानात २ अंशांची वाढ झाल्यांन तापमानाचा पारा २७ अंशांच्या पुढे गेला आहे.

मुंबईच्या किमान तापमानात वाढ
SHARES

मुंबईतील तापमानाच प्रचंड वाढ झाली आहे. गुरुवारी मुंबईच्या किमान तापमानात २ अंशांची वाढ झाल्यांन तापमानाचा पारा २७ अंशांच्या पुढे गेला आहे. मुंबईतील हे तापमान ५ वर्षांमधील एप्रिलमधील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचं किमान तापमान आहे. तसंच, गेल्या १० वर्षांमधील एप्रिलमधील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक किमान तापमान आहे.

मुंबईतील पुढील आठवड्यापर्यंत किमान तापमानाचा पारा २६ ते २७ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुरुवारी मुंबईकरांची सकाळ उकाड्यानं झाली. बुधवारी सांताक्रूझ इथं २५.४ अंश तापमान होतं. त्यामध्ये २ अंशाची वाढ होऊन गुरुवारी सकाळी सातांक्रूझ इथं २७.४ आणि कुलाबा २६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

कुलाबा इथं बुधवारी २५.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होतं. सरासरी किमान तापमानापेक्षा गुरुवारी किमान तापमान ४ अंशांहून अधिक होतं. त्यामुळे आता एसीचा वापर वाढण्याची शक्यताही आहे. वाढलेली आर्द्रता आणि तापमानाचा पारा यामुळं घरात बसून मुंबईकर घामाघूम होत आहेत. यामध्ये रस्त्यावर राहणाऱ्यांची तर अधिकच दैना होत आहे.

शनिवारपर्यंत किमान तापमानाचा पारा २७ अंशांच्या आसपास राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर एखाद्या अंशांनं तापमान कमी होईल. मात्र, पुढील आठवड्यात पुन्हा बुधवारपर्यंत किमान तापमान असेच २७ अंशांच्या आसपास चढे राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे नोंदवण्यात आला आहे. गेल्या १० वर्षांमधील एप्रिलमधील सर्वाधिक किमान तापमान २८.८ अंश सेल्सिअस होते. तर गेल्या वर्षी २०१९ मध्ये एप्रिल अखेरीस पारा २८.१ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. सन २०१५ पासून आत्तापर्यंतच्या पाच वर्षांत गुरुवारचे तापमान सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे किमान नोंदवले गेले.

गुरुवारी मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानामध्ये जेमतेम ७ अंशांचा फरक होता. कुलाबा येथे ३३.६ तर सांताक्रूझ येथे ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शुक्रवारीही कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास असेल. त्यामुळे दिवसभरात मुंबईत वातावरणात मोठा फरक जाणवण्याची शक्यता कमी आहे.



हेही वाचा -

३ मेनंतर होणार मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांबाबत निर्णय

मार्वे : समुद्रात बोट बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या दोघांचे मृतदेह सापडले



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा