Advertisement

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, पाडव्यापासून खुलणार सर्व धार्मिक स्थळं

पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावंच लागेल.

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, पाडव्यापासून खुलणार सर्व धार्मिक स्थळं
SHARES

दीपावली पाडव्याचा मुहूर्त साधत मंदिरांसह राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळं खुली करण्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार १४ नोव्हेंबर २०२० रोजी केली. त्यानुसार सोमवार १६ नोव्हेंबरपासून भाविकांना आपापल्या पद्धतीने पूजाअर्चा, उपासना करता येईल. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे मागील ७-८ महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आली होती. सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत विविध सेवा-सुविधा अनलाॅक केल्या असल्या, तरी धार्मिक स्थळं आतापर्यंत बंदच ठेवण्यात आली होती. यावरून राज्यात चांगलंच राजकारण रंगलं होतं. भाजप, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, रिपब्लिकन पक्षाने यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीवर आंदोलन, निर्दशने करून दबाव निर्माण केला होता. तरीही मुख्यमंत्र्यांनी या दबावापुढे न झुकता आपला निर्णय कायम ठेवला होता.

परंतु, दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, 'दिवाळीचं मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासूररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासूराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचं पालन केलं. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. 

हेही वाचा- कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते!- उद्धव ठाकरे

महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकंच नाही तर इतर धर्मियांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.'

कोरोना काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंद असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावंच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचं रक्षण करा. हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा