SHARE

राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात रुग्णांना कमी दरात उपचार मिळत असले तरी काही गंभीर आजारांच्या चाचण्यांची सोय अनेक ठिकाणी अजूनही उपलब्ध नाही. त्यामुळे अशा रुग्णांना बाहेरुन चाचण्या करण्याचा सल्ला अनेकवेळा डॉक्टर देतात. पण, आता राज्य सरकारने सर्व सरकारी रुग्णालयात 44 हून अधिक गंभीर आजाराच्या चाचण्या विनामूल्य करुन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

44 हून अधिक गंभीर आजारांच्या चाचण्या मोफत -
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या 'हिंदूस्तान एचएलएल लाईफकेअर लिमिटेड' या कंपनीशी करार देखील करण्यात आला आहे. या कराराद्वारे पुढील काही महिन्यांत राज्यभरात सव्वा दोनशे प्रयोगशाळा स्थापन करणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली आहे. कर्करोग, टायराईट आणि हार्मोन यांसारख्या 44 हून अधिक गंभीर आजारांचे निदान करण्याची सुविधा बहुतांश सरकारी रुग्णालयात उपलब्ध नाही. नव्या करारान्वये राज्यातील 16 सरकारी रुग्णालये, 1,811 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 485 अन्य सरकारी रुग्णालयांत रुग्णांना मोफत चाचण्यांची सोय होणार आहे.

अशी होईल चाचणी -
अशा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते संबंधित खासगी प्रयोगशाळांना पाठवले जातील. त्यानंतर रुग्णांच्या रिपोर्टनुसार रुग्णावर कोणत्या प्रकारचे उपचार करायचे हे ठरवणे डॉक्टरांना सोपे जाईल, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ.सतीश पवार यांनी दिली आहे.

'हिंदूस्तान एचएलएल लाईफकेअर' या कंपनीच्या प्रयोगशाळा महाराष्ट्र आणि केरळ अशा दोन ठिकाणी आहेत. सध्या पुणे, ठाणे, नंदूरबार, जळगाव , बीड, रायगड, रत्नागिरी, नागपूर, औरंगाबाद, रायगड, वर्धा, रत्नागिरी, धुळे, जालना, नाशिक, पालघर, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात अनेक खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या प्रयोगशाळांनाही यात समाविष्ट करुन घेतले जाणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या