Advertisement

ठाणे मेट्रो मुंबईला जोडणार

या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची चाचणी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे यशस्वीरित्या पार पडली.

ठाणे मेट्रो मुंबईला जोडणार
SHARES

ठाणे (thane) आणि मुंबईला (mumbai) मेट्रोने जोडणारी गायमुख-कासारवडवली-वडाळा या 'मेट्रो-4' (metro 4) व 'मेट्रो-4 अ' मार्गिकेची तांत्रिक तपासणी आणि मेट्रो गाड्यांची चाचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे यशस्वीरित्या पार पडली.

यावेळी 'पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत या मेट्रो मार्गिकेचे सर्व टप्पे प्रवाशांसाठी खुले होतील,' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 58 किमी लांबीची ही देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका आहे.

या मार्गिकेच्या गायमुख जंक्शन-गायमुख गाव-घोडबंदर रोड-कासारवडवली-विजय गार्डन या टप्प्याची चाचणी करण्यात आली.

'या मेट्रोच्या सर्व मार्गिका सुरू झाल्यावर यामध्ये 13 लाखांपेक्षा अधिक प्रवासी दैनंदिन प्रवास करू शकतील. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वात या मेट्रोच्या कामाला परवानगी मिळाली होती. त्यांच्याच काळात हा प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याचा विशेष आनंद होत आहे. वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल,' असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

हा टप्पा पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एकनाथ शिंदे व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन केले. 'मोघरपाडा येथे मेट्रो डेपोच्या जागेबाबत अडचणी होत्या. त्या दूर झाल्याने मेट्रोच्या कामाला वेग आला,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (pratap sarnaik), खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार रवींद्र फाटक, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते.

दरम्यान, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिल्याने महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अनुपस्थित राहिले.

तसेच शिवसेनेच्या तुलनेत भाजपचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी केली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.



हेही वाचा

जनतेच्या पैशातून मंत्र्यांना आलिशान गाड्या

अंधेरी: खड्ड्यामुळे अपघात होऊन तरुण जखमी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा