ठाणे शहराच्या मध्यभागी असलेला प्रसिद्ध ‘विव्हियाना मॉल'चं (Viviana Mall) नाव बदलण्यात आलं आहे. 'लेक शोर इंडिया ॲडव्हायझरी'ने विव्हियाना मॉल खरेदी केला आहे.
अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या (ADIA) पाठिंब्याने झालेला हा व्यवहार जवळपास 1900 कोटी रुपयांचा असून, भारतातील कोणत्याही रिटेल मालमत्तेसाठी झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे. या करारामुळे ठाण्याचे महत्त्व एक मोठे व्यावसायिक केंद्र म्हणून सिद्ध झाले आहे. ठाणे सिटी या वेबपोर्टलना याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
करार पूर्ण झाल्यानंतर, ‘विव्हियाना मॉल' आता ‘लेक शोर' या नावाने ओळखला जाणार आहे. या बदलामुळे मुंबई महानगर प्रदेशातील एक महत्त्वाचे शॉपिंग आणि लाईफस्टाईल डेस्टिनेशन म्हणून या मॉलच्या प्रवासाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. यापूर्वी विव्हियाना मॉलची मालकी सिंगापूरच्या ‘जीआयसी' आणि ‘अश्विन शेठ ग्रुप'कडे होती.
ठाण्यासाठी मोठा फायदा
1,900 कोटी रुपयांचा ऐतिहासिक करार भारतीय रिअल इस्टेट आणि रिटेल क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड मानला जात आहे.
ठाणे शहर वेगाने एक कॉर्पोरेट, निवासी आणि रिटेल केंद्र म्हणून विकसित होत आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी, प्रीमियम हाऊसिंग प्रोजेक्ट्स आणि वाढती शहरी लोकसंख्या यामुळे हे शहर ‘लेक शोर'सारख्या मोठ्या रिटेल डेस्टिनेशनसाठी एक मजबूत ग्राहक वर्ग निर्माण करत आहे.
ग्राहकांसाठी काय बदलणार?
मॉलचे नाव आणि मालकी बदलली असली तरी, जागतिक दर्जाचे शॉपिंग आणि मनोरंजन देण्याचे त्याचे वचन कायम आहे. जागतिक आणि भारतीय ब्रँड्सची येथील उपस्थिती कायम राहील.
हेही वाचा