मुंबईतही (Mumbai News) रिक्षा, टॅक्सीचा (Taxi Fare Hike) प्रवास महागणार आहे. मुंबईत रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
मुंबईत रिक्षाची दोन रुपयांनी तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ होणार आहे.. या निर्णयावर सोमवारी (26 सप्टेंबर) शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून मुंबईत रिक्षा,टॅक्सीचा प्रवास महागणार आहे.
मागील काही महिन्यांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे सीएनजी गॅसच्या दरातही वाढ झाली आहे.
राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅस आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत होता. त्याशिवाय वाढत्या महागाईच्या काळात आर्थिक गणित जमवणे रिक्षा-टॅक्सी चालकांना कठीण होत आहे.
सरकारकडून भाडेवाढ करण्याबाबत निर्णय न घेतल्यास रिक्षा टॅक्सी चालकांनी 26 तारखेला संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. 13 सप्टेंबरला मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठकीत निर्णय न झाल्याने संघटनांनी संपाचा पवित्रा घेतला आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांच्या संपापूर्वी सरकारकडून आज तातडीची बैठक घेतली. त्यानंतरच भाडे वाढीला मंजूरी देण्यात आली.