Advertisement

मुंबईतील 'हे' मार्केट अमेरिकेच्या कुप्रसिद्ध बाजारांच्या यादीत

अमेरिकेने जगभरातल्या सेकंड कॉपी वस्तूंच्या बाजारांची यादी तयार केली आहे.

मुंबईतील 'हे' मार्केट अमेरिकेच्या कुप्रसिद्ध बाजारांच्या यादीत
SHARES

मुंबईतल्या हाजीअली परिसरात असलेले प्रसिद्ध 'हिरा पन्ना मार्केट'चा अमेरिकेच्या कुप्रसिद्ध बाजारांच्या यादीत समावेश झाल आहे. 'हिरा पन्ना मार्केट' हे अमेरिकेच्या दृष्टीने कुप्रसिद्ध बाजारपेठ ठरलं आहे.

अमेरिकेने जगभरातल्या सेकंड कॉपी वस्तूंच्या बाजारांची यादी तयार केली आहे. या यादीत भारतातील लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट इंडियामार्ट डॉट कॉम, मुंबईतील हीरा पन्ना शॉपिंग सेंटर आणि नवी दिल्लीतील प्रसिद्ध पालिका बाजारसह ५ भारतीय बाजारपेठांचा समावेश आहे.

अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी प्रसिद्ध केलेल्या जगातील कुप्रसिद्ध बाजारांच्या नवीन वार्षिक यादीमध्ये या बाजारांचा समावेश करण्यात आला आहे. सन २०२१साठी गुरुवारी जाहीर झालेल्या या यादीमध्ये जगभरातील ४२ ऑनलाइन आणि ३५ पारंपरिक बाजारपेठांचा समावेश आहे.

मुंबईतील हाजी अली येथील प्रख्यात हिरा पन्ना शॉपिंग सेंटर हे ब्रँडेड वस्तू स्वस्तात मिळण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी बनावट घड्याळे, पादत्राणे, उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांची विक्री केली जाते. बनावट सौंदर्यप्रसाधनांमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे ‘यूएसटीआर’नी म्हटले आहे.

सप्टेंबर २०२१मध्ये या सेंटरवर टाकलेल्या छाप्यामध्ये नामांकित कंपन्यांच्या बनावट घड्याळांची विक्री सुरू असल्याचे आढळले होते. याप्रकरणी तेव्हा काही जणांना अटकही करण्यात आली होती.

दिल्लीतल्या पालिका बाजारमध्ये बनावट मोबाइल उपकरणे, सौंदर्यप्रसाधने, घड्याळे आणि चष्म्यांची विक्री केली जाते. दिल्लीच्याच टँक रोड मार्केटमध्येदेखील बनावट कपडे, पादत्राणे, घड्याळे, हँडबॅग, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, सौंदर्यप्रसाधने विकली जातात. बनावट वस्तूंची घाऊक विक्रीदेखील या मार्केटमधून केली जाते. गेल्या वर्षीही या बाजाराचा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा