Advertisement

माहीमची इको फ्रेंडली इमारत


माहीमची इको फ्रेंडली इमारत
SHARES

वीज बचतीसाठी माहीमच्या अवर लेडी ऑफ वैलांकणी ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीत पर्यावरण पूरक सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा माहीम विभागातील एकमेव उपक्रम आहे. या सोसायटीच्या टेरेसवर सौरऊर्जा प्रकल्प (सोलर एनर्जी प्लांट) बसवण्यात आला आहे. त्याद्वारे सोसायटीसाठी वीजनिर्मिती केली जाते. हा प्रोजेक्ट या सोसायटीचे सदस्य शास्त्रज्ञ डॉ. इमानूएल डिसिल्व्हा यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे.

आमची इमारत पर्यावरण पूरक बनवण्याचा विचार सर्व रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे येणारे वीज बिल तर कमी होईलच, त्याच बरोबर वीज बचत देखील होईल. या प्रयोगामुळे निश्चितच युनिट दर देखील कमी होण्यास मदत होईल.

- डॉ. इमानूएल डिसिल्व्हा

डॉ. डिसिल्व्हा यांनी रहिवाशांच्या मदतीने 15 एप्रिल 2017 ला हा प्लांट सुरू केला. तसेच एक ते दोन महिन्यांच्या कालावधीत वीज बिल नियंत्रित होईल, अशी अपेक्षा या इमारतीतल्या रहिवाशांनी व्यक्त केली. या 12 मजली इमारतीत 112 फ्लॅट्स आहेत. ज्यामध्ये हा सोलर पॉवर प्लांट लावण्यात आला आहे. या प्लांटची क्षमता 10 किलोव्हॅट इतकी असून त्यातून प्रतितास 60 युनिट वीज निर्मिती होते. इमारतीच्या लॉबी, जिन्यांवर आणि पाण्याच्या पंपासाठी या सोलर एनर्जीचा वापर होत आहे.

सोलर प्लांट बसवण्यासाठी 7.5 लाख रुपये एवढा खर्च आला असून 32 सोलर प्लांट बसवण्यात आले आहेत. आधी दरमहिन्याला या इमारतीच्या विजेचे बिल 55 हजार इतके येत होते. पण या सोलर विजेमुळे दरमहा 15 ते 18 हजार रुपये इतके वीजबिल येईल.

- ए. एम. सॉड्डर, सेक्रेटरी, अवर लेडी ऑफ वैलांकणी सोसायटी

गेल्या पाच-सहा वर्षांपासून या इमारतीतल्या ओल्या कचऱ्यापासून सेंद्रीय खत निर्मिती करणारा प्लांटदेखील सुरू आहे. दर दोन महिन्याला सहा ते सात किलो सेंद्रीय खत या इमारतीच्या ओल्या कचऱ्यापासून निर्माण होत असून इमारतीच्या उद्यानासाठी याच खताचा वापर केला जात आहे. या वर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग देखील करण्यात येणार असल्याची माहिती डिसिल्व्हा यांनी दिली. 

या इमारतीप्रमाणेच मुंबईतील इतर इमारतींनीसुद्धा अशा प्रकारे इकोफ्रेंडली बनण्याची कास धरल्यास आपली मुंबई प्रदूषणमुक्त होईल. अशा इमारतींची प्रेरणा घेऊन 'स्वच्छ भारत' सोबतच 'इकोफ्रेंडली भारत अभियान' देखील सरकारने राबवायला हवे.
एग्नोलो सलटाना, रहिवासी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा