Advertisement

ठाणे महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी हिमोग्लोबिनोपॅथी तपासणी मोहीम

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष हिमोग्लोबिनोपॅथी स्क्रीनिंग मोहीम सुरू केली आहे.

ठाणे महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी हिमोग्लोबिनोपॅथी तपासणी मोहीम
SHARES

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा यांच्या सहकार्याने महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष हिमोग्लोबिनोपॅथी स्क्रीनिंग मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेचे उद्घाटन 15 ऑगस्ट 2026 रोजी कळवा येथील TMC शाळा क्रमांक 69 मध्ये करण्यात आलं.

हिमोग्लोबिनोपॅथी हा अनुवंशिक रक्तविकारांचा समूह असून, त्यामध्ये सिकल सेल अॅनिमिया आणि थॅलेसेमिया यांसारख्या आजारांचा समावेश होतो. हे आजार पालकांकडून मुलांमध्ये येऊ शकतात. त्यामुळे लहान वयातच तपासणी केल्यास आजाराचं वेळेत निदान होऊन उपचार आणि आवश्यक काळजी घेणं शक्य होतं.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महापालिका माध्यमिक शाळा क्रमांक 2 तसेच शाळा क्रमांक 69, 70 आणि 115 मधील एकूण 250 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

तपासणीत आजाराची शक्यता आढळल्यास विद्यार्थ्यांना पुढील उपचार, आवश्यक लसीकरण, पोषणविषयक मार्गदर्शन आणि नियमित वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

ही मोहीम TMC शिक्षण विभागाच्या उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, ग्रुप ऑफिसर संगीता बामणे आणि रुग्णालयाच्या डीन डॉ. स्वप्नाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.

लहान वयातच रक्तविकारांचं निदान करून विद्यार्थ्यांना योग्य उपचार आणि मार्गदर्शन देणं, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.



हेही वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर पदव्युत्तर डिप्लोमा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा