Advertisement

खारफुटीवरील भराव रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी नसल्यामुळे हा खर्च करायचा कसा, याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

खारफुटीवरील भराव रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
SHARES

ठाणे (thane) शहराला लाभलेल्या खाडी किनारी भागात खारफुटीवर मातीचा भराव टाकून अतिक्रमण होते. हे रोखण्यासाठी ठाणे महापालिका (tmc) प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून पाऊले उचलली आहेत. खाडी किनारी भागातील रस्ते खणून हे मार्ग बंद करण्यापाठोपाठ आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

याशिवाय, खारफुटीवर (mangroves) टाकण्यात आलेला भराव काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या कामासाठी 28 ते 30 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी नसल्यामुळे हा खर्च करायचा कसा, याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

ठाणे शहराला सुमारे 32 किमीचा खाडीकिनारा परिसर लाभला आहे. ठाणे खाडी परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी-प्रजाती आढळून येतात. या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. यामुळेच ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा आहे.

असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून भू-माफियांकडून खाडी किनारी भागात भराव टाकून अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढले आहेत. या अतिक्रमणामुळे खाडी किनारी भागातील खारफुटी मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे.

यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येण्याबरोबरच भविष्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपुर्वी ठाणे शहरातील मुंबई महापालिकेच्या (bmc) जलवाहिनीला लागूनच असलेल्या कोलशेत खाडी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात भराव टाकून नवे बेट उभारण्यात येत असल्याची बाब समोर आली होती.

यावरून टिका होऊ लागताच पालिका आणि जिल्हा प्रशासनाने भराव रोखण्याचे काम हाती घेतले होते. कोलशेत खाडी किनारी भागात खारफुटीवर भराव टाकण्यासाठी भू-माफियांनी तयार केलेले रस्ते खणून हा मार्गच बंद करण्याचे काम पालिकेने केले होते.

त्यापाठोपाठ आता या भागांमध्ये मातीचा भराव टाकला जाऊ नये यासाठी पालिकेने 34 ठिकाणी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवले आहेत. त्यात आतापर्यंत काही मातीचा भराव टाकणारे ट्रक आढळून आले आहेत. याबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाकडून संबंधित प्रभाग समितीला कळवले आहे. त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कोकण विभागीय कांदळवन समितीकडे खाडी किनारी भागातील भरावाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याआधारे या समितीने खाडीकिनारी भागात टाकलेला भराव काढून टाकण्याची सुचना पालिकेला केली आहे.

त्यामध्ये खारेगाव टोल नाका परिसर, कोलशेत खाडीजवळील जलवाहिनीलगतचा भाग आणि कोलशेत विसर्जन घाट परिसर, चेंदणी परिसर या भागांचा समावेश आहे. येथील भराव काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे.

या कामासाठी 28 ते 30 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे या कामासाठी पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या कामासाठी निधी कुठून आणायचा, याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.



हेही वाचा

वर्सोव्यातील मनसे उमेदवाराला दोन्ही निवडणुकीत सारखीच मते

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा