Advertisement

१ फेब्रुवारीपासून टीव्ही होणार बंद!

केबल असोसिएशननं दिलेल्या मुदतवाढीच्या मागणीकडे केंद्र सरकार कानाडोळा करत असल्यानं १ फेब्रुवारीला टीव्ही बंद झाल्यास त्याला केबलचालक जबाबदार राहणार नाहीत.

१ फेब्रुवारीपासून टीव्ही होणार बंद!
SHARES

टेलिकाॅम रेग्युलेटरी अॅथाॅरिटी आॅफ इंडिया (ट्राय) च्या नव्या नियमावलीनुसार आपल्या आवडीचं टीव्ही चॅनल्स निवडून त्या निवडक चॅनल्सचे शुल्क भरण्यासाठी ट्रायनं दिलेली मुदत संपण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. ३१ जानेवारीच्या रात्री ही मुदत संपत असून ग्राहकांनो तुम्ही तर अजूनही आपल्या आवडीचं चॅनल्स निवडून त्यासाठीचं शुल्क भरलं नसेल तर तुमच्या घरातील टीव्ही १ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून बंद होण्याची शक्यता आहे.

कारण देशातील ६५ टक्के ग्राहकांनी आपल्या आवडत्या चॅनल्सची यादी बनवली नसल्यानं याचा फटका कोट्यवधी ग्राहकांना बसणार आहे. आणि यामुळे कोट्यवधी ग्राहकांच्या घरातील टीव्ही बंद होण्याची शक्यता असल्याची माहिती केबल आॅपरेटर्स अॅण्ड ब्राॅडकास्ट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अॅड. अनिल परब यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. ६५ टक्के ग्राहकांची यादी बनवणं बाकी असतानाही केंद्र सरकार आडमुठी भूमिका घेत आहे. केबल असोसिएशननं दिलेल्या मुदतवाढीच्या मागणीकडे केंद्र सरकार कानाडोळा करत असल्यानं १ फेब्रुवारीला टीव्ही बंद झाल्यास त्याला केबलचालक जबाबदार राहणार नाहीत, असा इशाराही परब यांनी दिला आहे.


३१ जानेवारीला संपणार मुदत

काही दिवसांपूर्वी ट्रायने आपल्या नियमावलीत मोठे बदल केले होते. त्यानुसार ग्राहकांना आपलं आवडतं फ्री टू एअर आणि पैसे भरून मिळणारी टीव्ही चॅनल्स पाहण्यासाठी चॅनल्सची निवड करावी लागणार आहे. आणि या निवडलेल्या चॅनल्ससाठीच पैसे मोजावे लागणार आहे. ही निवड करत ग्राहकांकडून संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ट्रायनं ३१ डिसेंबरची मुदत दिली होती. परंतु ट्रायच्या या नव्या नियमावलीला मुंबईतील केबल चालकांनी आणि त्यांच्या संघटनेनं जोरदार विरोध दर्शवला होता. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन करत केबल सेवाही बंद केली होती. त्यानंतर ट्रायनं चॅनल्स निवडीच्या प्रक्रियेला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.


६५ टक्के ग्राहकांचा टीव्ही होणार बंद?

ट्रायकडून देण्यात आलेली मुदत संपण्यासाठी आता केवळ सहा दिवस शिल्लक आहेत. असं असताना अजूनही देशातील ६५ टक्के ग्राहकांनी चॅनल्स निवडलेले नाहीत, यादी बनवलेली नसल्याचं परब यांनी सांगितलं आहे. ६५ टक्के ग्राहकांनी यादी बनवली नसल्यानं आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केबल आॅपरेटर्स अॅण्ड ब्राॅडकास्ट असोसिएशनकडून करण्यात आली आहे. मात्र या मागणीकडे काणाडोळा करत, खोट्या माहितीच्या आधारे, ८० टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी यादी बनवल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं येत्या १ फेब्रुवारीपासून ट्रायनं नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रायच्या या आडमुठ्या भूमिकेमुळं देशातील ६५ टक्के ग्राहकांच्या घरातील टीव्ही १ फेब्रुवारीपासून बंद होईल असंही परब यांनी स्पष्ट केलं आहे.


तर आम्ही जबाबदार नाही

केबलचालकांना बुके (चॅनल्स पॅकेज) विकण्याची परवानगी दिली जात नसून ट्रायकडून फाॅर्मही आलेले नाहीत. असं असतानाही ट्राय मुदतीवर ठाम असल्याचं म्हणत १ फेब्रुवारीपासून टीव्ही बंद झाल्यास त्याला केबलचालक जबाबदार नसतील असंही परब यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा -

खुशखबर! फक्त १५३ रुपयांत पहा १०० वाहिन्या

मुंबईत केबल सेवा बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा