Advertisement

वडाळ्यातील संक्रमण शिबिरात घाणीचे साम्राज्य


वडाळ्यातील संक्रमण शिबिरात घाणीचे साम्राज्य
SHARES

प्यायला पाणी नाही, नैसर्गिक विधींसाठी शौचालय नाही, रस्त्यावर विद्युत दिवे नाहीत, तर सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने गटारे, नाले कचऱ्याने ओसंडून वहात आहेत. सध्या अशीच स्थिती वडाळा (पू.) येथील कोकरी आगार परिसरातील संक्रमण शिबिरात उद्भवली आहे. या ठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र याकडे पालिका आणि एमएमआरडीए प्रशासनाने घुसखोर असल्याचे कारण पुढे करत येथील नागरिकांना सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.

गेल्या 13 वर्षांपासून वडाळा पूर्व कोकरी आगार येथील संक्रमण शिबिरात 3 हजार 600 झोपडीधारक वास्तव्याला आहेत. येथील नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने पाणी, शौचालय आदी मूलभूत सुविधा पुरवण्यात येत नसल्याने येथील नागरिकांना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही याकडे प्रशासन अधिकारी कानाडोळा करीत असल्याचा संताप स्थानिक नागरिक मोहंमद अली जावेद खान यांनी व्यक्त केला आहे. तसेच घुसखोर असल्याचा ठपका ठेऊन पालिका तसेच एमएमआरडीए प्रशासनाने या विभागाकडे दुर्लक्ष केल्याने आज या विभागाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे 15 दिवसाला 500 रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे. विभागातील शौचालयाची अवस्था बिकट असल्याने ते बंद असून सुलभ शौचालयासाठी प्रत्येक घराला प्रती महिना 50 ते 100 रुपये मोजावे लागत आहेत. रस्त्यावर दिवाबत्ती नसल्याने छेडछाड आणि चोरीचे प्रकार वाढीस लागले आहेत. पालिकेच्या वतीने वेळेत गटारे आणि नालेसफाई होत नसल्याने अनेकांच्या घरात सांडपाणी शिरते. त्यात पावसाळा तोडांवर आला असून अदयाप येथील छोट्या आणि मोठया नाल्यांची साफसफाई करण्यात आली नसल्याने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या पावसात पाणी तुंबून घरात शिरणार असल्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नाले आणि गटारांची साफसफाई नियमित करण्यात येते. सदरील ठिकाणची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्यात येईल आणि लवकरात लवकर येथील साफसफाई करण्यात येईल.

- केशव उबाळे, सहाय्यक आयुक्त, एफ उत्तर विभाग

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा