Advertisement

विधानभवन परिसरात कोसळली झाडं


विधानभवन परिसरात कोसळली झाडं
SHARES
Advertisement

निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईला चांगलाच बसला आहे. मुंबईमधील अत्यंत महत्वाचा भाग असलेल्या विधानभवन परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठी वृक्ष उन्मळून पडली आहे. विधानभवन परिसराकडून मंत्रालयाकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा झाडे आहेत. त्यापैकीच ४ मोठी झाडं मुळासकट उन्मळून पडली आहेत. विधानभवन परिसर हा मुंबईमधील प्रशासकीय इमारती, मोठ्या बँका तसेच महत्वाची खासगी कार्यालये असणारा परिसर आहे. 

समुद्रकिनाऱ्यापासून अगदी नजीक अंतरावर असणाऱ्या या परिसामध्ये वेगानं वारे वाहत आहे. विधानभवनाकडून विधानभवन मेट्रो स्थानकाकडं जाणाऱ्या मार्गावरील चार मोठी झाडे दुपारच्या सुमारास उन्मळून पडल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. रस्त्यावर झाडांच्या फांद्या आणि लाकडांचा खच पडल्याचे चित्र दिसत आहे.

या परिसरामध्ये पडलेली झाडं रस्त्यावरुन बाजूला काढून अत्यावश्यक सेवेमधील वाहतूक पुन्हा सुरु करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी कामाला लागले आहेत. येथील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाऱ्यामुळे झाडं पडली तेव्हा सुदैवाने रस्त्यावर कोणीही नव्हते. त्यामुळे यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

मुंबई पोलिसांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच वांद्रे वरळी सी लिंकवर कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीला परवानगी देण्यात येणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत आपात्कालिन परिस्थिती उद्भवल्यास खबरदारीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे.

आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी मुंबईत अग्निशमन दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच मुंबईतील सहा समुद्र किनाऱ्यांवर ९३ जीवरक्षकांना तैनात करण्यात आले आहे.

संबंधित विषय
Advertisement