Advertisement

भांडुपच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयावरून शिवसेना टार्गेट


भांडुपच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयावरून शिवसेना टार्गेट
SHARES

भांडुपमध्ये मुंबई महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या आड आता विकासक आला असून, त्याला 8 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा परत करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपात चांगलीच जुंपली आहे. रुग्णालयासाठी आरक्षित असलेली एक इंचही जागा विकासकाला देऊ नये, अशी मागणी करत भाजपाने हा प्रस्ताव फेटाळून लावण्याची मागणी केली. परंतु भाजपाची मागणी मान्य न करता शिवसेनेने हा प्रस्ताव राखून ठेवत पुढील बैठकीत यावर निर्णय घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपाने, या प्रस्तावावरून शिवसेनेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत एकप्रकारे विकासकाला मदत करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप केला आहे.

भांडूप पश्चिम नाहूर गावमधील नगर भू क्रमांक 681/अ/8ब या भूखंडावर विकासक रुणवाल होम्स यांनी विकास हस्तांतरीत हक्क (टिडीआर) देण्याच्या बदल्यात 18,765.30 चौरस मीटर क्षेत्रफळाचा रुग्णालयासाठी आरक्षित असलेला सुविधा भुखंड महापालिकेच्या ताब्यात दिला होता. परंतु येथील रस्त्यांची जागा सोडण्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर विकासक रुणवाल होम्स यांनी महापालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 21 ऑक्टोबर 2015 मध्ये 8209.30 चौ.मी क्षेत्रफळाची जागा विकासकाला परत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याविरोधात सर्वौच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयानेही उच्च न्यायालयात फेर याचिका करण्याचे आदेश दिले. परंतु न्यायालयात योग्यप्रकारे बाजू न मांडणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे दाखले देत 8209.30 चौ.मी.ची जागा परत विकासकाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपाच्या नगरसेविका ज्योती अळवणी यांनी हे रुग्णालय होणे आवश्यक असल्यामुळे हा प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची मागणी केली. माजी अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनीही या रुग्णालयाची गरज असल्याचे सांगत प्रशासन याबाबत गप्प का? असा सवाल केला. त्यामुळे हा प्रस्ताव रेकॉर्डच करणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा

भांडुपमधील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रद्द


माजी महापौर विशाखा राऊत यांनी विधी विभागाचे अधिकारी महापालिकेचा पगार घेऊन विकासकांचे काम करत असल्याची शंका उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली पाहिजे असे सांगितले. माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी हा प्रस्ताव न्यायालयाच्या आदेशानुसार आणला गेल्याचे सांगत यावर निर्णय घेताना न्यायालयाचा अवमान होणार नाही ना याची काळजी घेणेही आवश्यक असल्याचे सांगितले. हे रुग्णालय भांडुपला होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदही करण्यात आली आहे. त्यामुळे ही जागा जर परत देण्याची वेळ येत असेल तर जे कोणी विधी विभागाचे अधिकारी हे प्रकरण हाताळत होते, त्यांची चौकशी व्हायला हवी. काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी रुग्णालयाची गरज असल्यामुळे हा प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची मागणी केली. परंतु सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन आपल्याला कुठेही विकासकाला मदत करायची नाही. परंतु या प्रकरणातील तांत्रिक माहिती समोर येणे आवश्यक असून, संपूर्ण माहिती पुढील बैठकीत आणण्याचे आदेश देत हा प्रस्ताव राखून ठेवला. त्यामुळे भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या रेकॉर्डच्या सुचनेवर मतदान घेण्याची मागणीही त्यांनी केली. परंतु एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यावर फेरनिर्णय घेतला जात नाही. त्यामुळे भाजपाच्या मागणीचा विचार अध्यक्षांनी करण्यास नकार दिला. त्यामुळे अध्यक्षांचा निषेध करत भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयासाठी आरक्षित असलेली जागा विकासकाच्या घशात जावू नये ही भाजपाची भूमिका आहे. त्यामुळेच आमच्या सदस्यांनी रेकॉर्डची मागणी केली होती. परंतु त्यांनी ती मान्य न करता राखून ठेवली. त्यामुळे त्यांच्या पोटात काय आहे, त्यांना कुणाला मदत करण्याचा विचार आहे, हे त्यांनाच माहीत अशा शब्दांत शिवसेनेचा समाचार घेतला. या जागेचा बाजार भाव 500 कोटींचा आहे. त्यामुळे तो विकासकाला आंदण देण्याचा डाव असून, त्याला भाजपाचा तीव्र विरोध असल्याचे कोटक यांनी सांगितले. मात्र सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही. तो राखून ठेवला असून, संपूर्ण माहिती आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. परंतु भाजपाची रेकॉर्डची मागणी होती असे ते सांगतात. पण ती उपसूचना नव्हती. त्यांनी उपसूचनेद्वारी ही मागणी केली असती तर आम्हाला मतास टाकणे, त्यावर निर्णय घेणे बंधनकारक होते. पण तशी उपसूचना नसल्यामुळे प्रस्ताव राखून ठेवला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ही जागा विकासकाच्या घशात जाणार नसून, शिवसेनेच्या वचन नाम्यानुसार रुग्णालयच होणार असल्याचे नर यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा