Advertisement

भांडुपमधील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रद्द


भांडुपमधील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रद्द
SHARES

पूर्व उपनगरातील भांडुपमध्ये मुंबई महापालिकेचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचे स्वप्न अखेर धुळीस मिळाले. रुग्णालयासाठी आरक्षित असलेली जागा विकासकाला परत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता ही जागाच विकासकाला परत देण्याचा निर्णय महापलिकेने घेतला आहे. तब्बल 8 हजार चौरस मीटरची जागा परत देण्याची वेळ पालिकेकडे आली आहे. त्यामुळे विकासकापुढे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नांगी टाकल्यामुळे एकप्रकारे रुग्णालयाचे स्वप्न भंग पावले आहे.

भांडुप पश्चिम नाहुर गावामधील नगर भू क्रमांक 681/अ/8ब या भूखंडावर विकासक रुणवाल होम्स यांनी विकास हस्तांतरीत हक्क (टीडीआर) देण्याच्या बदल्यात 18,765.30 चौरस मीटर क्षेत्रफळाचा रुग्णालयासाठी आरक्षित असलेला सुविधा भूखंड महापालिकेच्या ताब्यात दिला होता. त्यानुसार या भूखंडाचे मालमत्ता पत्रक मे 2014 मध्ये महापालिकेच्या नावावर करण्यात आले. त्यानंतर महापालिकेने विकासकांना या एकूण क्षेत्रफळाचे टीडीआर प्रमाणपत्र जून 2014 मध्ये दिले. हा टीडीआर विकासकाने आपल्या उर्वरीत बांधकामांसाठी वापरला आहे. त्यानुसार महापालिकेने आपल्या नव्या विकास आराखड्यात या क्षेत्रफळाच्या जागेवर रुग्णालयाचे आरक्षण टाकले. परंतु येथील रस्त्यांची जागा सोडण्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर विकासक रुणवाल होम्स यांनी महापालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 21 ऑक्टोबर 2015 मध्ये 8209.30 चौ.मी. क्षेत्रफळाची जागा विकासकाला परत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयानेही उच्च न्यायालयात फेर याचिका करण्याचे आदेश दिले. परंतु यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विकासकाला स्मरणपत्र पाठवण्याऐवजी काहीच केले नसून, उलट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची भीती विकासकाने दाखवल्यामुळे अखेर ही जागाच पुन्हा विकासकाला देऊन स्वत:ची सुटका करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.


हेही वाचा

लोढांना प्रभाग समिती कार्यालयाचा ओढा, महापालिका कार्यालयाचा आमदारांकडून वापर

महापालिका, सरकारी कार्यालयांकडे बेस्टची 80 कोटींची थकबाकी


त्यानुसार अखेर 8209.30 चौ.मी क्षेत्रफळाची जागा परत देण्याचा प्रस्ताव विकास नियोजन विभागाने सुधार समितीपुढे मंजुरीला आणला आहे. यामध्ये ही जागा विकासकाला दिल्यानंतर महापालिकेच्या ताब्यात 10,556 चौ.मी. क्षेत्रफळाची जागा राहणार आहे. विकासक आणि महापालिकेचे अधिकारी संयुक्तपणे याची पाहणी करून त्याचे पोट विभाजन करणार असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 10 हजार चौरस मीटरच्या जागेत रुग्णालयाची इमारत, वसाहत, डॉक्टर आणि नर्सेससाठी वसाहत तसेच इतर बांधकामे करणे शक्य नसून, यामुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याची संकल्पना गुंडाळावी लागेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा