Advertisement

लोढांना प्रभाग समिती कार्यालयाचा ओढा, महापालिका कार्यालयाचा आमदारांकडून वापर


लोढांना प्रभाग समिती कार्यालयाचा ओढा, महापालिका कार्यालयाचा आमदारांकडून वापर
SHARES

महापालिका कार्यालयावर झेंडा फडकवण्यास असमर्थ ठरलेल्या भाजपाने आपल्या नगरसेवकांना प्रभाग समिती अध्यक्षपदी बसवत एकप्रकारे प्रभागांची सत्ता आपल्याच हाती ठेवली आहे. या प्रभाग समिती अध्यक्षांच्या कार्यालयांतून जनतेची कामे होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र भाजपाकडून या कार्यालयांचा वापर पक्ष कार्यालय म्हणून केला जात आहे. 'सी' व 'डी' प्रभाग समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर तर भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनीच कब्जा केला आहे.

नगरसेवकांव्यतिरिक्त आमदार तसेच खासदारांना महापालिकेच्या कार्यालयांचा वापर करता येत नाही. असे असतानाही दरदिवशी सकाळी 9 वाजताच प्रभाग समिती अध्यक्षांचे कार्यालय उघडून लोढांचा दरबार भरला जात आहे. मार्च महिन्यापासून लोढांचा प्रभाग कार्यालयाकडील ओढा वाढलेला असतानाही प्रशासन आणि कोणत्याच पक्षाचे याकडे लक्ष नाही, हे विशेष.

'लोढा फाऊंडेशन'चे कर्मचारीच उघडतात कार्यालय -

महापालिकेच्या 'सी' व 'डी' प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका जोत्स्ना मेहता यांची निवड झाली आहे. मात्र मेहता यांच्या ऐवजी भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा त्यांच्या कार्यालयाचा वापर करत आहेत. प्रभाग समिती अध्यक्षांचे कार्यालय सकाळी 9 वाजताच उघडले जाते. समिती अध्यक्षांच्या कार्यालयात महापालिकेचे कर्मचारी असतानाही हे कार्यालय 'लोढा फाऊंडेशन'चे कर्मचारी सुरक्षा विभागाकडून चावी घेऊन उघडतात.

सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कार्यालयात लोढांचा वावर -

सकाळी 9 ते दुपारी 11-12 वाजेपर्यंत या कार्यालयाचा वापर आमदार आपल्या विभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करतात. त्यानंतर प्रभाग समिती अध्यक्षांचे आगमन झाल्यावर ते निघून जातात. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत लोढा फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांकडून या कार्यालयाचा वापर होत असून त्याकडे महापालिका प्रशासन तसेच शिवसेनेसह इतर पक्षांच्या नगरसेवकांचेही लक्ष नसल्याचे दिसत आहे. या भागातील काही नगरसेवक लोढांच्या पंखाखाली असल्यामुळे ते याविरोधात आवाज काढत नसल्याचे म्हटले जात आहे.

कार्यालयातील साहित्याचा गैरवापर - 

मंगलप्रभात लोढांना आपल्या कार्यालयाचा वापर करता यावा म्हणून अध्यक्ष जोत्स्ना मेहता यांनी 30 मार्च 2017 ला 'डी' विभाग कार्यालयातील सुरक्षा अधिकाऱ्यांना पत्र लिहून प्रभाग समिती कार्यालयाची चावी रोहित सावंत यांच्याकडे देण्यास सांगितले होते. सुरक्षा अधिकारी तसेच चिटणीस विभागानेही ही चावी देण्याची परवानगी नाकारली होती. आजही लोढांचीच माणसे येऊन हे कार्यालय उघडत आहेत. प्रभाग समिती अध्यक्षांचे कार्यालय हे तेथील शिपाई वर्गातील कर्मचाऱ्याने उघडणे अपेक्षित असताना हे कार्यालय बाहेरील व्यक्ती येऊन उघडत आहे. एवढेच नव्हे, तर येथील सर्व साहित्यांचा तसेच फोनचा वापरही लोढांचे कार्यकर्ते करत असतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा