Advertisement

ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं निधन


ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं निधन
SHARES

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले जेष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचे मंगळवारी सावंतवाडी येथे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री मुंबईत आणले जाणार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी गोरेगाव येथील सिद्धार्थनगरमधील त्यांच्या घरापासून निघणार असून ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि 2 मुले आहेत. समाजवादी कार्यकर्त्यांमध्ये ते 'सर' या नावाने ओळखले जात होते.

लहानपणापासून समाजकार्याची आवड असलेले प्रा. गोपाळ दुखंडे. कोकणासह महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांसाठी त्यांनी लढे दिले. कोकणातील तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी मिळावी म्हणून 'कोकण रेल्वे जनाधिकार समिती'ची त्यांनी स्थापना केली होती. कोकण रेल्वे प्रत्यक्षात येण्याकरता झालेल्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व प्रा. दुखंडे यांनी केले होते.

मालवण विधानसभा मतदार संघातून त्यांनी 1995 साली नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक देखील लढवली होती. मुंबई विद्यापीठात ते सिनेटचे सदस्य देखील होते. मुंबई विद्यापीठाचा कारभार मराठीत चालावा असा त्यांचा आग्रह असे. छात्रभारतीच्या मुंबईच्या कामात त्यांनी पहिल्यापासूनच लक्ष घातले होते. कपिल पाटील, शरद कदम या त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांना हाताशी धरुन त्यांनी अनेक आंदोलनेही उभी केली होती. रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांसोबत काढलेला मोर्चा, गिरणी कामगारांच्या लढाईत दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेला चड्डी-बनियान मोर्चा किंवा भारतमाता सिनेमा वाचवण्यासाठी झालेले आंदोलन अशा प्रत्येक लढाईत प्रा. दुखंडे नेहमीच पुढे असत.

प्रा. गोपाळ दुखंडे सरांनी आमच्यासाठी आणि या चळवळीसाठी खूप काही करुन ठेवले आहे. त्यांच्या जाण्याने माझं आणि पुरोगामी चळवळीचं खूप मोठं नुकसान झालं आहे.

- शरद कदम, कार्याध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, मुंबई

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा