स्थापत्य समिती अध्यक्षपदी विशाखा राऊत

 BMC
स्थापत्य समिती अध्यक्षपदी विशाखा राऊत

मुंबई - महापालिकेच्या स्थापत्य समिती अध्यक्षपदी माजी महापौर विशाखा राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांची निवड झाली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी दोन्ही उमेदवारांचे एकमेव अर्ज प्राप्त झाले असल्यामुळे गुरुवारी झालेल्या निवडणुकीत या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे पिठासीन अधिकारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले.

मुंबई महापालिकेच्या स्थापत्य समिती शहर आणि स्थापत्य समिती उपनगरे तसेच सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षपदासाठीची निवडणूक गुरुवारी पार पडली. स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षपदासाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार तुळशीराम धोंडीबा शिंदे तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार निधी प्रमोद शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाले. त्यामुळे त्यांची अनुक्रमे अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून मुंबईच्या उप महापौर हेमांगी वरळीकर यांनी काम संभाळले

सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षपदी रोहिणी कांबळे यांची निवड

सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी योगेश कांबळे तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार समाधान सदा सरवणकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे दोघांची अनुक्रमे अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुकीचे पिठासीन अधिकारी म्हणून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले.

Loading Comments