मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ८५.६८ टक्के पाणीसाठा जमा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणखी एक तलाव ओव्हर फ्लो झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

SHARE

मुंबईसह अनेक भागांत मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणखी एक तलाव ओव्हर फ्लो झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी अन्य तलावही येत्या काही दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं मुंबईकरांचा पाणीप्रश्न आता मिटण्याची शक्यता आहे.

३ तलाव भरली

मुंबईला पाणी पुरवठा करणारे तुलसी, तानसा आणि मोडकसागर ही ३ तलाव भरली होती. १२ जुलै रोजी तुलसी, तर २५ जुलै रोजी तानसा आणि २७ जुलै रोजी मोडकसागर तलाव भरून वाहू लागले होते. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ८५.६८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील जुलै महिन्यातील पाणीसाठ्याच्या तुलनेत हा साठा जास्त असून गेल्या वर्षी ८३.३० टक्के पाणीसाठा जमा झाला होता.

पाण्याच्या पातळीत वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळं भातसा आणि मध्य वैतरणा या तलावांतही चांगली पाण्याची पातळी वाढत आहे. मुंबईला दरदिवशी ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. दरम्यान, बुधवारी सकाळी सातही तलावात मिळून १२ लाख २० हजार ११२ दशलक्षलिटर म्हणजेच ८५.१६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या