Advertisement

दुरुस्तीनंतरही पाणीगळती सुरूच


दुरुस्तीनंतरही पाणीगळती सुरूच
SHARES

मुंबई महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच जलवाहिनी फुटलेली असून याठिकाणची गळती दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केल्यानंतरही मंगळवारी संध्याकाळी यातून हजारो लिटर्स पाणी वाहून गेले. गळती दुरुस्त केल्याची आकडेवारी देणाऱ्या जलअभियंता विभागाने महापालिकेच्या मुख्यालयाबाहेरील जलवाहिनी दुरुस्ती करता येत नसेल, तर मुंबईतील काय अवस्था असेल? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक १ समोर तसेच भुयारी मार्गाशेजारी असलेल्या बस स्थानकाच्या खालून सोमवारी संध्याकाळी जलवाहिनीला गळती लागली. यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. पदपथ आणि रस्ता यांच्या सुरक्षा भिंतीच्या खालूनच पाणी वाहून जात असल्यामुळे या भागाला पाणी पुरवठा करणारी ४ इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे ही दुरुस्ती त्वरीत करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

प्रत्यक्षात याठिकाणचे दोन चार पेव्हरब्लॉक उखडून दुरुस्ती केल्याचा बनाव करण्यात आला. मंगळवारी संध्याकाळी गळती लागलेल्या जलवाहिनीमधून हजारो लिटर्स पाणी वाहून गेले. अनेक नागरिकांनी याची तक्रार महापालिका कार्यालयात करूनही कोणतीही हालचाल करण्यात आलेली नव्हती.

महापालिका मुख्यालयात खुद्द महापालिका आयुक्त अजोय मेहता तसेच पाणी प्रकल्प विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखजी, उपायुक्त रमेश बांबळे हे स्वत: बसत असूनही सलग दुसऱ्या दिवशी होणाऱ्या जलवाहिनीतील गळतीकडे त्यांचे लक्ष नव्हते. त्यामुळे मुख्यालयाबाहेरील गळती दुरुस्त करण्यात जर महापालिकेचे अधिकारी कामचुकारपणा व दुर्लक्ष करत असतील तर मुंबईतील इतर ठिकाणच्या गळती दुरुस्तीचे काम ते काय करत असतील, हाच प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे.



हेही वाचा -

जलवाहिनीलगतच्या झोपड्यांवर आता कारवाई होणार!

तानसा जलवाहिनीच्या मोकळ्या जागेत जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा