SHARE

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तानसा जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला असलेल्या प्रत्येकी दहा मीटर परिक्षेत्रातील बांधकामे हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून प्राप्त झाल्यानंतर ही जलवाहिनी बांधकामांच्या विळख्यातून मुक्त करण्यात येत आहे. अधिकृत आणि अनधिकृत झोपड्या तसेच बांधकामे तोडून मोकळ्या करण्यात येणाऱ्या या जागेवर आता जॉगिंग ट्रॅक तसेच सायकल ट्रॅक उभारण्याचा महापालिकेचा विचार आहे. या दृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने अभ्यास अहवाल तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी जलअभियंता विभागाला दिला आहे.

मुंबईत सुमारे 39 किलोमीटर लांबीची तानसा जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी मुलुंड ते धारावी आणि घाटकोपर ते शीव या भागांमधून जात आहे. या जलवाहिनीच्या दुतर्फा असणाऱ्या 10 -10 मीटरच्या संरक्षित परिसरात उभारल्या गेलेल्या अतिक्रमणांना हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने 9 प्रशासकीय विभागांपैकी टी’, ‘एस’, ‘एन’, ‘एम-पश्चिम’ आणि ‘जी-उत्तर’ या 5 प्रशासकीय विभागांच्या हद्दीतील तानसा जलवाहिनीच्या सभोवतालची अतिक्रमणे हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित ‘एल’, ‘एफ -उत्तर’, ‘के -पूर्व’, ‘एच -पूर्व’ या 4 प्रशासकीय विभागांमध्ये काम प्रगतीपथावर असल्याची माहिती उपायुक्त रमेश बांबळे यांनी दिली आहे.


हेहा वाचा

तानसा पाईपलाईन जवळील डेब्रिज लवकर हटणार

विद्याविहार येथील तानसा पाईपलाईनवरील झोपड्या तोडण्याचे काम सुरू


मुंबईच्या हद्दीतील 39 किलोमीटर लांबीच्या तानसा जलवाहिनीच्या दुतर्फा असणारी 10-10 मीटरची जागा मोकळी झाल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. परंतु या संरक्षित मोकळ्या जागेचा नागरिकांना चांगल्याप्रकारे उपयोग व्हावा, या जागेत सायकल आणि जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहे. हा प्रस्ताव तयार करताना जलवाहिनीच्या देखभालीसाठी आवश्यक असणारी जागा मोकळी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विमानतळ प्राधिकरण, भांडुप संकुल, खाजगी जागा यासारख्या जागांमध्ये जॉगिंग तसेच सायकल ट्रॅकचे बांधकाम करता येणार नाही. या भागातून हे बांधकाम वगळण्यात येणार असल्याचे बांबळे यांनी सांगितले. या प्रस्तावाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने प्रस्तावनुरुप कृती आराखडा तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार याबाबत प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्याचे कार्य प्रगतीपथावर असल्याचीही माहिती रमेश बांबळे यांनी दिली आहे.

कोणत्या भागातून तानसा जलवाहिनी -

ही जलवाहिनी महापालिकेच्या टी, एस, एम-पश्चिम, एन, एल, एफ -उत्तर, के पूर्व, एच -पूर्व, एच- पश्चिम आणि जी- उत्तर या 10 प्रशासकीय विभागातून जाते. यामध्ये मुलुंड, भांडुप, सहार, वाकोला, हुसेन टेकडी, खार-पूर्व, माहीम, धारावी, घाटकोपर, कुर्ला पूर्व, आणिक डेपो आदी परिसरांचा समावेश होतो.

संबंधित विषय
ताज्या बातम्या