तहानलेल्या वाटसरूंसाठी बांधण्यात आलेली दिंडोशी विभागातल्या पुष्पापार्क सबवे जवळील पाणपोई बंद अवस्थेत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाच वर्षापूर्वी ही पाणपोई बांधण्यात आली होती. मात्र कालांतराने तीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा परिणाम या पाणपोईवर झाला. या पाणपोईच्या दुरुस्तीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने पाणपोईच्या सभोवती फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार वाटसरूंनी केली आहे.
या पाणपोईजवळ रिक्षास्टँड आहे. त्यामुळे रिक्षाचालक, प्रवासी, इतर तहानलेले वाटसरूही याच पाणपोईवर अवलंबून होते. मात्र पाणपोई बंद झाल्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. ही पाणपोई लवकरात लवकर पुनर्जिवित करून जनसेवेसाठी खुली व्हावी यासाठी स्थानिक रहिवासी मित्रमंडळ, साईराम विचारधारा फाऊंडेशन, पांडव बिट्स मित्रमंडळ आणि नवनिर्माण संघर्ष ग्रुपने पुढाकार घेतला आहे.
याबाबत स्थानिक रहिवासी रुपेश दळवी यांनी सांगितले की, पाणपोई सुरू करून तेथील अतिक्रमण हटवावे. जेणेकरून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल. यासाठी स्थानिक प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असल्याचं ते म्हणाले.
संबधित विभागाला सांगून पणपोईची पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर दुरुस्तीबाबत विचार केला जाईल, असे महापालिकेच्या पी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता हंसनाळे यांनी सांगितले.