Advertisement

बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांकडूनच लाखो लीटर पाणीचोरी

मुंबई महापालिकेचे (बीएमसी) दोन उपप्रमुख अभियंते पाणीचोरी करत असल्याचं उघडकीस आलं आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची बढती रोखण्यात आली आहे.

बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांकडूनच लाखो लीटर पाणीचोरी
SHARES

मुंबई महापालिकेचे (बीएमसी) दोन उपप्रमुख अभियंते पाणीचोरी करत असल्याचं उघडकीस आलं आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची बढती रोखण्यात आली आहे. शिवडी ते डॉकयार्ड रोड परिसरातील सहा बंदरांमध्ये लागणाऱ्या बोटींना महापालिकेचे दोन अभियंता मागील १७ वर्षांपासून दररोज तीन लाख लिटरहून अधिक पाणी बेकायदा देत असल्याचा आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका सभागृहात केला.  या पाणीचोरीमुळे पालिकेचा ६८० कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा दावा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.  या पाणी चोरीबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

बाबासाहेब महादेव साळवे आणि अजय सुरेंद्रनाथ राठोर अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांची प्रमुख अभियंता (स्थापत्य व अभियांत्रिकी गट) म्हणून मिळणारी बढती रोखण्यात आली आहे. संजय महादेव जाधव, बाबासाहेब महादेव साळवे, अजय सुरेंद्रनाथ राठोर, अरुण भिवा भोईर व विवेक रघुनाथ मोरे हे पालिकेत उपप्रमुख अभियंता (स्थापत्य व अभियांत्रिकी गट) आहेत. त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रमुख अभियंतापदी बढती देण्याचा प्रस्ताव मंगळवारी पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला.  यावेळी बाबासाहेब साळवे व अजय राठोर यांच्यावर पाणीचोरीचे गंभीर आरोप असल्याने त्यांना बढती देऊ नये, अशा आशयाची उपसूचना स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडली.

साळवे व राठोर हे शिवडी ते डॉकयार्ड रोड परिसरातील लकडा बंदर, रेती बंदर, कोळसा बंदर, कौला बंदर, घासलेट बंदर, हाजी बंदर या सहा बंदरांमधील बोटींच्या मालकांना १७ वर्षांपासून बेकायदा दररोज तीन लाख लिटर पाणी देत असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. माझगाव येथील दारूखाना परिसर बीपीटीच्या अखत्यारित आहे. येथील लोकवस्तीला पाणीपुरवठा करण्यास पालिकेला बीपीटी परवानगी देत नव्हती. तत्कालीन नगरसेविका यामिनी जाधव यांनी प्रयत्न करून बीपीटीच्या परवानगीने या भागात पाण्याचे मीटर लावून जलजोडण्या दिल्या.

या जोडण्यांमधून साळवे व राठोर यांनी १७ वर्षांपूर्वी एक बेकायदेशीर जोडणी पाणीमाफियांना दिली. या जोडणीतून बंदरांमध्ये येणाऱ्या बोटींना पाणीपुरवठा केला जातो आहे. या दोन अभियंत्यांनी काही दिवसांपूर्वी आणखी एक जोडणी माफियांना दिली. त्यातून आणखी साडेतीन लाख लिटर पाणी रोज दिले जात आहे. एक हजार लिटरसाठी ४५० रुपये आकारले जातात. पालिकेकडे तक्रार केल्यानंतर या जोडण्या बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जाधव यांनी दिली. 



हेही वाचा -

हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा मृत्यू

परदेशात नोकरीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा