परदेशात नोकरीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

नोव्हेंबर महिन्यात तक्रारदार सोशल मिडियावर आँस्ट्रेलिया येथील एका रुग्णालयात नोकरी संदर्भातील जाहिरात पाहिली होती. त्यानुसार त्यांनी त्या संकेतस्थळावर त्यांचे प्रोफाइल अपलोड केले.

परदेशात नोकरीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
SHARES

परदेशातील नामांकित रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी देण्याच्या नावाखाली एकाला सायबर ठगांनी १ लाख १२ हजारांना गंडा घातल्याची घटना दादर येथे घडली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दादर परिसरात राहत असलेले तक्रारदार हे सध्या मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नोव्हेंबर महिन्यात तक्रारदारांनी सोशल मिडियावर आॅस्ट्रेलिया येथील एका रुग्णालयात नोकरी संदर्भातील जाहिरात पाहिली होती. त्यानुसार त्यांनी त्या संकेतस्थळावर त्यांचे प्रोफाइल अपलोड केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तक्रारदाराला एका महिलेचा फोन आला. तिने तुमची आॅस्ट्रेलियातील सिडनी येथील नामांकित रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाल्याचं सांगितलं. तसा मेलही तिने तक्रारदारांना केला होता. त्या मेलमध्ये त्याचे पद, नोकरीचे ठिकाण, वेतन, अशा गोष्टी नमूद केल्या होत्या.

त्याचबरोबर तिने प्रोसेसिंग फी म्हणून सात हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी ती रक्कम मेलवरील खात्यावर पाठवली. तक्रारदाराला विश्वास बसावा यासाठी आरोपींनी राजीव सिंग नावाने तक्रारदाराला फोन करत, त्यांना ८ हजार डाॅलर पगार देणार असल्याचे कळवले. मात्र त्यास तक्रारदाराने नकार कळवला. त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा तक्रारदारास अॅन्योनी मॅथ्यू या नावाने फोन करून पैसे वाढवून देण्याचे आमीष दाखवत प्रोसेसिंग फी १७ हजार रुपये भरण्यास सांगितली.  तसंच वेतनात घरभाडे, प्रवास खर्च असा १३ हजार डाॅलर पगाराचे आमीष दाखवले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रोसेसिंगच्या नावाखाली त्याने हजारो रुपये उकळले. मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही पैशांची मागणी थांबतच नसल्याने तक्रारदारांना संशय आला. त्यानंतर त्यांनी संबंधीत रुग्णालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जात नोकरीबाबत चौकशी केली असता त्यांची फसवणूक झाली असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी त्यांनी भोईवाडा पोलिसात तक्रार नोंदवली आहे.


 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा