Advertisement

आणखी काही दिवस निघणार मुंबईकरांचा घामटा


आणखी काही दिवस निघणार मुंबईकरांचा घामटा
SHARES

सप्टेंबर महिना हा पावसाचा महिना असला तरी गेले काही दिवस मुंबईकरांची घामामुळे अक्षरश लाही लाही झाली आहे. त्यातही सोमवारी म्हणजेच 11 सप्टेंबर 2017 हा दिवस गेल्या 10 वर्षांत सप्टेंबर महिन्यातील सर्वात उष्ण दिवस मानला जात आहे. कारण, सोमवारी पारा 35 डिग्रीवर जाऊन पोहोचला होता. सोमवारचे तापमान नेहमीपेक्षा 5 अंशांनी अधिक होते. हे तापमान आणखी काही दिवस कायम राहणार आहे.

सकाळी 10 वाजताही दुपारी 12 वाजल्याचा अनुभव मुंबईकरांना सध्या येत आहे. घामाच्या धारांनी मुंबईकरांची आंघोळ होत आहे. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहणार असल्याचे मुंबईच्या कुलाबा हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या 10 वर्षांत सप्टेंबरच्या सुरुवातीलाच अशाप्रकारे पारा अचानक वाढण्याची आणि उन्हाचे चटके बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आधी सप्टेंबरच्या शेवटी अशी परिस्थिती निर्माण होत होती.

आर्द्रता 92 टक्क्यांवर पोहोचल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. ओला झालेला रुमाल, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, लिंबाच्या सरबताचे ग्लास, जिथे सावली मिळेल, वारा ज्या ठिकाणी लागेल, अशा ठिकाणी आसरा शोधणारे मुंबईकर असे चित्र सोमवारी मुंबईत दिवसभर होते.


मुंबईची हवा वाहतेय पूर्वेकडून

सध्या मुंबईची हवा पूर्वेकडून वाहतेय. ज्या वेळेस हवा पश्चिम दिशेहून वाहू लागेल, तेव्हा मुंबईतील तापमान कमी होईल. सोमवारीही मुंबईवर धुरक्याची चादर कायम होती. प्रचंड आर्द्रता आणि धुरके यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता.

इशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता कमी झाली. कुलाबा, भांडुप, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी तर पश्चिम उपनगरात बोरीवली, कांदिवली, अंधेरी या ठिकाणी हवेत धुलिकणांचे प्रमाण अधिक दिसले. त्यामुळे आणखी काही दिवस मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


3 ते 4 दिवसांत पाऊस 

सप्टेंबर महिना सुरू झाला की परतीच्या पावसाची सुरुवात होते. पण, आता सध्या पावसासाठी चांगले वातावरण नाही. त्यामुळे 3 ते 4 दिवसांत पाऊस पडेल पण, तोपर्यंत हवेतील दमटपणा, आर्द्रता असाच कायम राहणार आहे.


हवा पूर्वेकडून वाहत आहे. पश्चिमेकडून वाहिली की वातावरणात बदल आणि थंडावा निर्माण होईल. परतीचा पाऊस 3 ते 4 दिवसांत परत येईल. पाऊस नसल्याकारणाने खूप उकडत आहे. पण, आता आणखी काही दिवसानंतर हा उकाडा कमी होईल.

- अजयकुमार, डायरेक्टर, हवामान विभाग, कुलाबा


हेही वाचा - 

मुंबईकरांनो काळजी घ्या, उन्हाचा पारा वाढलाय!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा