क्रीडा भवनातील आंबा महोत्सव कुणाच्या आशीर्वादाने

 Dadar (w)
क्रीडा भवनातील आंबा महोत्सव कुणाच्या आशीर्वादाने
Dadar (w), Mumbai  -  

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कापून घेत क्रीडा भवन उभारले. परंतु प्रत्यक्षात क्रीडा भवनाची सुविधा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना न देता एकप्रकारे त्याचे व्यावसायिकरणच सुरू असल्याचा आरोप मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी केला. शिवाजी पार्क येथील क्रीडा भवन कामगारांसाठी बंद आहे, मात्र, त्या जागेत आंबा महोत्सव भरवला गेला आहे. या क्रीडा भवनाची चावी कुणाच्या सांगण्यावरून उघडली गेली असा सवाल करत लांडे यांनी हा आंबा महोत्सव कोणाच्या आशीर्वादाने भरवला गेला, असा जाब प्रशासनाला विचारला आहे.

महापालिकेतील कामगारांचे मनोरंजन व्हावे तसेच त्यांचे क्रीडा कौशल्य जपले जावे म्हणून क्रीडा भवनाची निर्मिती केली आहे. परंतु या जागेत कामगारांना प्रवेश नसला तरी शिवाजी पार्कमधील क्रीडा भवनाच्या जागेत आंबा महोत्सव सुरू आहे. या क्रीडा भवनाला जर टाळे होते, तर मग कोणाच्या सांगण्यावरून हे टाळे उघडून या महोत्सवाला ते उपलब्ध करून दिले याची चौकशी केली जावी, अशी मागणी दिलीप लांडे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. 

याच क्रीडा भवनाच्या एका जागेत टेनिस कोर्ट चालवले जाते, तेथील जागा लग्नसोहळयासाठी दिली जाते, मग कामगारांना याचा लाभ का मिळत नाही, असा सवाल त्यांनी केला. कामगारांकडून वर्गणी काढून हे क्रीडा भवन चालवले जाते. यापूर्वी या क्रीडा भवनातील संचालक मंडळाचा भ्रष्टाचार समोर आला होता. त्याची चौकशीही झाली आहे. मग याचा अहवाल समोर का आणला जात नाही? प्रशासन कुणाला पाठीशी घालत आहे? असा सवाल करत याचीही चौकशी केली जावी, अशी मागणी लांडे यांनी केली.

Loading Comments