Advertisement

दादरमध्ये महापालिका, फेरीवाल्यांत आटापाट्याचा खेळ


दादरमध्ये महापालिका, फेरीवाल्यांत आटापाट्याचा खेळ
SHARES

महापालिकेने दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करत तीन दिवसांमध्ये 16 ट्रक माल जप्त केल्याचा दावा केला असला तरी या कारवाईदरम्यानही फेरीवाल्यांचे धंदे जोरात सुरु असल्याचे दिसत आहे. कारवाई करणाऱ्या पथकाची गाडी उभी असूनही बाजूच्या रस्त्यावर फेरीवाले पथारी पसरून बिनधास्त बसतात. काही ठिकाणी गाडी आल्यावर विक्रेते पळ काढत असून महापालिका अधिकारी गेल्यावर पुन्हा अवतरत आहेत. याकडे पाहून महापालिका आणि फेरीवाल्यांमध्ये आटापाट्याचा खेळ सुरू असल्याचेच दिसत आहे.

परिमंडळ २ चे उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जी/ उत्तर विभागाने 16 मे पासून अनधिकृत फेरीवाले, विक्रेत्यांच्या विरोधातील कारवाई तीव्र केली आहे. दादर पश्चिमेकडील रानडे रोड, छबीलदास गल्ली, न. चि. केळकर मार्ग, डॉ. डिसिल्व्हा मार्ग, जावळे मार्ग, दादर कबुतरखाना, सेनापती बापट मार्गावरील केशवसूत उड्डाण पुलाखालील भाग, दादर पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा पादचारी पूल आदी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

तीन दिवसांतील कारवाई दरम्यान 16 ट्रक भरेल एवढा माल जप्त करून 245 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केल्याचा दावा जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर यांनी केला आहे. मात्र, ही कारवाई सुरु झाल्यानंतरही दादर फेरीवालामुक्त बनवण्यात महापालिकेला यश आले नसून उलट या कारवाईनंतर अधिकाऱ्यांची पाठ फिरल्यानंतर फेरीवाले पुन्हा धंदा थाटत असून अधिकारी आल्यावर पळून जात आहे.

एकप्रकारे या कारवाईत फेरीवाल्यांकडून आटापाट्याचा खेळ सुरु असून दरबार हॉटेल समोर डिसिल्व्हा मार्ग, छबिलदास मार्ग, जावळे मार्ग, दादर कबुतर खाना येथे कारवाईदरम्यानही फेरीवाले बसून व्यवसाय करताना दिसत असल्यामुळे खुद्द नागरिकांमध्येच हास्याचा विषय ठरत आहे. महापालिकेची ही कारवाई केवळ नावापुरती असल्यामुळे प्रशासनाविरोधात फेरीवाल्यांमध्ये धाक राहिलेला नाही. अशाप्रकारे कारवाई करून हप्ताबाजी वाढवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा दादरमध्ये कारवाईदरम्यान ऐकायला मिळत होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा