घाटकोपरमध्ये दोघा सुरक्षा रक्षकांवर लांडग्याचा हल्ला

 Ghatkopar
घाटकोपरमध्ये दोघा सुरक्षा रक्षकांवर लांडग्याचा हल्ला
Ghatkopar, Mumbai  -  

मुंबईकरांवर बिबट्याचे हल्ले होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. मात्र घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील मलनि:सारण केंद्र परिसरात चक्क एका लांडग्याने दोघा सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी घडला आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. या परिसरात मागच्या काही दिवसांपासून लांडग्याचा वावर आहे. याची माहिती वनविभागाला देऊनही त्यांनी केवळ पाहणी करण्यापलीकडे लांडग्याला पकडण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप जखमी सुरक्षा रक्षकांनी केला आहे.

येथील महापालिकेच्या मलनि:सारण प्रक्रिया केंद्रात कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक चेतन पाटील यांच्यावर सोमवारी दुपारच्या सुमारास या लांडग्याने हल्ला केला. त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी राकेश शुक्ला या खासगी सुरक्षा रक्षकाच्या हाताचा त्याने चावा घेतला. या जखमी सुरक्षा रक्षकांना त्वरीत राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर दोघांना पुढील उपचारांसाठी सायनच्या टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परिसरात लांडग्याचा वावर असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी केवळ परिसराची पाहणी करून निघून गेले. मात्र या लांडग्याला पकडण्यासाठी त्यांनी कुठलीही उपाययोजना केली नाही. त्यातच दुपारच्या वेळेस केंद्राची पाहणी करताना अचानक या लांडग्याने हल्ला केल्याची माहिती पालिकेचे सुरक्षा रक्षक चेतन पाटील यांनी दिली.

तर, खासगी सुरक्षा रक्षक राकेश शुक्ला म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात पिसाळलेल्या लांडग्याची दहशत आहे. वारंवार तक्रार करून देखील वनविभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच हा जीवघेणा प्रकार घडला आहे.

लांडग्याचा हल्ला पुन्हा होण्याची भीती असल्याने त्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी येथील सर्व कर्मचारी करत आहेत.

Loading Comments