जागतिक कर्करोग दिनानिमित्त ४ फेब्रुवारीपासून राज्यात ‘कर्करोग जागृती पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या काळात कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मुंबईतील मालाड मालवणी भागातील सामान्य रुग्णालयात कर्करोग तपासणी केंद्र सुरू करण्यात आलं आहे. टाटा मेमोरीयल हॉस्पिटल आणि कॅन्सर वॉरीअर्स डॉक्टरांच्या सहकार्याने आठवड्यातून दोन वेळा कर्करोग बाह्यरुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर येथेही तपासणी करण्यात येणार आहे.
प्राथमिक अवस्थेत मौखिक कर्करोगाचं निदान कर्करोग पूर्व लक्षणांमध्ये झाले तर कर्करोगाचा बरा होण्याचा दर ७൦ ते ७५ टक्के आहे. हे लक्षात घेऊन राज्यात डिसेंबर २൦१७ मध्ये संपूर्ण महिनाभर मौखिक आरोग्य तपासणी मोहीम आरोग्य विभागांमार्फत टाटा मेमोरीअल हॉस्पिटलच्या सहकाऱ्याने महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये राबवली.
या मोहिमेंतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये २ कोटी ८ लाख ४० हजार ८५२ इतक्या लोकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. नाशिक मंडळात २६ टक्के, लातूर ८ टक्के, ठाणे ८ टक्के, औरंगाबाद ७ टक्के, अकोला १० टक्के, पुणे १२ टक्के, कोल्हापूर १३ टक्के आणि नागपूर मंडळामार्फत १६ टक्के तपासणी केली.
तपासणी करण्यात आलेल्या एकूण रुग्णांपैकी २५ टक्के रुग्णांमध्ये मौखिक अस्वच्छता आढळून आली. त्यामुळे त्यांना मौखिक स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. त्यापैकी अंदाजित एक लाखापेक्षा जास्त संशयित प्रकरणे (पांढरा चट्टा, लाल चट्टा, तोंड न उघडता येणं आणि तोंडातील १५ दिवसांपेक्षा अधिक काळ असलेला व्रण) ही लक्षणं आढळून आली आहेत.
मोहिमेचा दुसरा टप्पा जानेवारी २०१८ पासून सुरू झाला आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील संशयित रुग्णांची फेरतपासणी करून त्यांच्या पूर्व कर्करोग व्रणांच्या ठिकाणाची बायोप्सी करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यामध्ये कर्करोगाचं निश्चित निदान केलेल्या रुग्णांना उपचार देण्यात येईल. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयांमध्ये जेथे कर्करोग उपचार सुविधा उपलब्ध आहेत. अशा रुग्णालयांची माहिती घेऊन तेथे अथवा नजिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये संशयित रुग्णांना पाठवलं जाईल.
जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने रविवारपासून राज्यात कर्करोग जागृती पंधरवडा साजरा केला जाणार आहे. हा नवीन उपक्रम आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणार आहे. तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे दुष्परिणामाबाबत या उपक्रमात सांगण्यात येणार आहे.
तंबाखूमुक्त शाळेसाठी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कॅन्सर वॉरिअर्सच्या माध्यमातून कर्करोग तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांनी कर्करोग पंधरवडा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं आहे.