Advertisement

लाल चाळीच्या रहिवाशांचा बिल्डरविरोधात आक्रोश मोर्चा

टॉवरमध्ये राहण्याच्या आशेतून काही झोपडीधारक बिल्डरची कुठलीही शहानिशा न करता त्याच्यासोबत पुनर्विकासाचा करार करून मोकळे होतात आणि झोपडीचा ताबा सोडतात. पण पुढे जाऊन असे झोपडीधारक फसवणुकीलाही बळी पडतात. मुंबईत अशी असंख्य उदाहरणे आहेत.

लाल चाळीच्या रहिवाशांचा बिल्डरविरोधात आक्रोश मोर्चा
SHARES

मुंबईत गेल्या ५ वर्षांत प्रचंड वेगाने पुनर्विकास सुरू आहे. झोपडपट्ट्या तोडून त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. सर्वत्र पुनर्विकास होत असताना टॉवरमध्ये राहण्याच्या आशेतून काही झोपडीधारक बिल्डरची कुठलीही शहानिशा न करता त्याच्यासोबत पुनर्विकासाचा करार करून मोकळे होतात आणि झोपडीचा ताबा सोडतात. पण पुढे जाऊन असे झोपडीधारक फसवणुकीलाही बळी पडतात. मुंबईत अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यात भर पडली आहे, ती वरळी नाका येथील लाल चाळीतल्या रहिवाशांची. बिल्डरने फसवल्याच्या विरोधात बुधवारी लाल चाळीतील रहिवाशांनी आक्रोश मोर्चा काढला होता.


घर खाली, पण भाडं मिळालं नाही

वरळी नाक्यावर असलेल्या लाल चाळी पुनर्विकासाच्या नावाखाली ओरिकॉन प्रॉपर्टी प्रा. लि. यांनी खाली करून घेतल्या. या चाळी रिकाम्या केल्यानंतर बिल्डरने वर्षभर भाडं दिलं. पण फेब्रुवारी २०१७ पासून या रहिवाशांना भाडं मिळालेलं नाही. चाळीतील बहुतांश रहिवासी मध्यमवर्गीय असल्याने काम करून कुटुंब सांभाळत असताना घराचं भाडं देणं या रहिवाशांसाठी कठीण झालं आहे.  ओरिकॉन प्रॉपर्टी प्रा. लि. ने म्हाडाला हाताशी धरून लाल चाळीच्या रहिवाशांना ९५ ए कलमांतर्गत राहत्या जागेवरून बाहेर काढल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे.


रहिवाशांचा आक्रोश मोर्चा

ओरिकॉन प्रॉपर्टी प्रा. लि. ने चाळीची जागा इंडिया बुल्स कंपनीला परस्पर विकल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या व्यवहारात मूळ रहिवाशांना विश्वासात घेण्यात आलं नसल्याचंही यावेळी रहिवासी म्हणाले. गीता टॉकीज परिसरातून रहिवाशांनी हा आक्रोश मोर्चा काढला.


बिल्डरने आमची फसवणूक केली हे स्पष्ट आहे. पण आम्हाला न्याय मिळेपर्यंत बिल्डरने आम्हाला भाडे द्यावं. भाडं मिळालं नाही तर आम्ही पुन्हा झोपड्या बांधून आतमध्ये राहायला जाणार आहोत. आम्ही म्हाडा, पालिकेकडे पत्रव्यवहार केला. परंतु योग्य उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही हा मोर्चा काढला. यापुढे न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करणार.

- मिनाक्षी मयेकर, रहिवासी


२०१५ साली आम्ही आमच्या चाळी पुनर्विकासासाठी ओरिकॉन प्राॅपर्टी लि.च्या ताब्यात दिल्या. तेव्हा रोहन मेहता बिल्डर होते. सध्या ओरिकॉनकडे रोहन मेहता बिल्डर नाहीत. आम्हाला गेल्या दोन वर्षात बिल्डरने रूम, पार्किंग, गार्डन, असा कोणताही मॅप दाखवलेला नाही. हा मॅप आम्हाला दाखवण्यात यावा यासाठी आम्ही कोर्टात गेलो. बिल्डरच्या विरोधात आमची लढाई कोर्टात सुरू असल्यामुळे बिल्डरने फेब्रुवारी २०१७ पासून आमचं भाडं बंद केलं आहे. रहिवाशांना मानसिक त्रास देण्यासाठी बिल्डरने हा नवीन प्रयोग सुरू केला आहे. ओरिकॉनच्या वरळीच्या कार्यालयात या संदर्भात निवेदन दिलेले आहे. लवकरच आम्हाला भाडं मिळेल, अशी अपेक्षा आहे.

- मंगेश चाळके, रहिवासी



हेही वाचा - 

घाटकोपरमध्ये रहिवाशांचा पालिकेवर घागर मोर्चा

'ते' 155 रहिवासी अजूनही मृत्यूच्या सावटाखालीच!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा