
पश्चिम रेल्वे (WR) ने 1 फेब्रुवारी 2026 पासून 12 डब्यांच्या नॉन-एसी उपनगरीय लोकलच्या 4 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या सेवांमुळे मुंबई उपनगरीय विभागातील पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांची संख्या 1406 वरून 1410 इतकी वाढणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कांदिवली–बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे (6th Line) काम पूर्ण झाल्यामुळे या अतिरिक्त सेवा सुरू करणे शक्य झाले आहे.
सहावा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर बांद्रा टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या बोरिवली ते बांद्रा टर्मिनसदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाली आहे.
सुरू करण्यात येणाऱ्या 4 सेवांपैकी 2 सेवा अप (UP) दिशेने आणि 2 सेवा डाऊन (DOWN) दिशेने असतील, व त्या स्लो मार्गावरून धावतील.
अप दिशेतील सेवा भायंदर–बांद्रा (प्रस्थान वेळ 11.39) आणि भायंदर–चर्चगेट (प्रस्थान वेळ 12.14) अशी असेल.
तसेच डाऊन दिशेतील अतिरिक्त 2 सेवा बांद्रा–भायंदर मार्गावरून धावतील, ज्यांची प्रस्थान वेळ 04.30 आणि 13.21 अशी आहे.
या नव्या सेवांच्या समावेशामुळे काही विद्यमान लोकल सेवांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा
